धुळे : शहरातील राष्ट्रवादी भवनावरील ताब्यावरुन दोन्ही गटात निर्माण झालेला वाद मंगळवारी उफाळून आला. प्रदेश उपाध्यक्ष (शरद पवार गट) माजी आमदार अनिल गोटे हे राष्ट्रवादी भवनाला कुलूप लावून बाहेर पडताच अजित पवार गटाने भवनाचे कुलूप तोडून ताबा घेतला. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्यासह शरद पवार समर्थकांच्या कार्यकर्त्यांचा गटही भवनावर पोहोचला आणि या गटानेही राष्ट्रवादी भवनावर दावा सांगितला. यामुळे दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ राष्ट्रवादी भवनाकडे धाव घेतली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गोटे यांनी सायंकाळी त्यांच्या कार्यकर्त्यांची नगाव (ता.धुळे) येथे बैठक आयोजित केली होती. तत्पूर्वीच गोटे यांनी राष्ट्रवादी भवनातील त्यांचे साहित्य आपल्या ताब्यात घेऊन भवनाला कुलूप लावले. शरद पवार गटातर्फे रणजितराजे भोसले, रईस काझी, जोसेफ मलबारी यांनी तर अजित पवार गटातर्फे सारंग भावसार,गणेश जाधव,किरण शिंदे यांनी राष्ट्रवादी भवनावर दावा केला आहे. यासंदर्भात अनिल गोटे यांच्याशी संपर्क साधला असता आपण आपल्या साहित्यासह आज राष्ट्रवादी भवन सोडले, राष्ट्रवादी पक्षपदाच्या राजीनाम्याबाबत उद्या निर्णय जाहीर करेन असे सांगितले.