धुळे : धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेसला चांगला जनाधार असल्याने ही जागा काँग्रेसने लढवावी, असा आपला आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले. परंतु, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्यास त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी सारवासारवही पाटील यांनी केली. धुळे महानगर पालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवून पालिकेवर सत्ता स्थापन करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : कावळेही आता व्यसनाधीन!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत जोडो यात्रेच्या वर्धापन दिनानिमित्ताने येथे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्ष फोडून सत्तेत येण्याचे भाजपचे धोरण आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. आंदोलकांवर लाठीमार केला जात आहे. लोकांमध्ये भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी कमालीचा रोष आहे. महागाई, बेरोजगारी यामुळे जनता मोदी सरकारला कंटाळली असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेमुळे धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूरमध्ये काँग्रेसचे संघटन आणि ताकद वाढली आहे. यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावर नव्हे तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवून मनपात सत्ता स्थापन करु, असे त्यांनी सांगितले.