लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळांसाठी राज्यातील ४२ केंद्रावर एकूण ५७.८७ टक्के मतदान झाले. मतमोजणी २० मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून विद्यापीठ मुख्यालयात करण्यात येणार असून मतदान मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीसाठी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडल्याचे सांगितले. एकूण ११ हजार ७४२ मतदारांपैकी सहा हजार ७९५ मतदारांनी हक्क बजावला. राज्यात सर्वाधिक मतदान वाशिम जिल्हयातील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आयुर्वेदिक महाविद्यालयातील केंद्रावर शंभर टक्के झाले. सर्वात कमी मतदानाची नोंद पुण्यातील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे १२.८१ टक्के झाली.

आणखी वाचा- कंत्राटी सहायक अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात

मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याबद्दल कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी मतदारांचे आभार मानले. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, उपकुलसचिव डॉ. सुनील फुगारे, ॲड. संदीप कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी निवडणूक कामकाजाची प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी नाशिक शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Counting of votes for health university authority election tomorrow mrj
First published on: 19-03-2023 at 12:21 IST