नाशिक : चाकरमान्यांची मुख्य भिस्त असणारी मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे शनिवारी सकाळी कसारा स्थानकालगत कपलिंग तुटल्याने प्रवासी वर्गात धास्ती पसरली. रेल्वेतील सर्व प्रवासी सुखरूप असून दुरुस्तीनंतर ४० मिनिटांनी पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे मार्गस्थ झाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कसारा घाट उतरून पंचवटी एक्स्प्रेस कसारा स्थानकात आली. सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास ती कसारा स्थानकातून मार्गस्थ होत असताना ही घटना घडली. इंजिनच्या चौथ्या व पाचव्या बोगींना जोडणारी व्यवस्था (कपलिंग) विलग झाली. पाचवी बोगी नियमित महिला प्रवासी महिलांसाठी राखीव असते. अकस्मात आवाज झाला. नंतर काही डबे इतर डब्यांना मागे सोडून पुढे जाताना दिसले. यामुळे काही प्रवासी महिला घाबरल्या. इतर महिलांनी त्यांना धीर दिला. यापूर्वी असे प्रकार घडल्याचे प्रवाशांकडून सांगितले गेले. इंजिन पुढे सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आले. कसारा स्थानकाजवळ ही घटना घडल्याने दुरुस्ती काम लगेचच सुरू झाले. दुरुस्ती झाल्यानंतर साडेनऊ वाजेच्या सुमारास रेल्वे मुंबईकडे रवाना झाली.

हेही वाचा : नाशिकमध्ये अतिक्रमण निर्मुलन मोहिमेचा विस्तार; गोविंदनगर, द्वारका भागात हॉटेलांसह अनधिकृत बांधकामांवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावर कसारा घाटात प्रवासी रेल्वेगाड्यांना घाट चढताना अतिरिक्त इंजिन जोडावे लागते. कसारा स्थानकात ही प्रक्रिया पार पडते. घाट उतरताना म्हणजे इगतपुरीकडून कसाराकडे जाताना तसे इंजिन जोडले जात नाही. कसारा घाटात वा गाडी भरधाव असताना ही घटना न घडल्याने मोठा अनर्थ टळला, अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून उमटली. या घटनेची रेल्वेने गंभीर दखल घेतली आहे. जबाबदारी निश्चित करण्यासाठी सखोल चौकशी केली जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे गाडीला ४० मिनिटे विलंब झाला.