लोकसत्ता टीम

देवळा : येथील जनुभाऊ आहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आक्रमक होत पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षांसह सहकार अधिकाऱ्याला संस्था कार्यालयात कोंडून ठेवले. सायंकाळी उशिरा वसुली करून पैसे परत केले जातील, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उभयतांची सुटका करण्यात आली.

देवळा येथे जनुभाऊ आहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची १९९४ रोजी स्थापना झाली. अनेक ठेवीदारांनी या संस्थेत पैसे गुंतवले आहेत. कर्ज वसुलीअभावी संस्था अवसायनात निघाल्याने ती १२ वर्षांपासून बंद आहे. ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. सहकार विभागाकडे पाठपुरावा करूनही आपल्या हक्काचे पैसे परत मिळत नसल्याने त्यांची अस्वस्थता उफाळून आली.

आणखी वाचा-नाशिक शहरात १५ लाखांपासून पाच कोटींपर्यंत घरे, आजपासून शेल्टर २०२४ गृह प्रदर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहकार अधिकारी वसंत गवळी व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय आहेर हे दुपारी संस्था कार्यालयात आले असताना संतप्त ठेवीदारांनी त्यांना कार्यालयात डांबून ठेवले. बाहेरून टाळे लावल्याने खळबळ उडाली. अडीच तासानंतर सहकार अधिकारी गवळी यांनी ठेवीदारांना वसुली करून आपले पैसे लवकरात लवकर देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कार्यालयाचे कुलूप उघडून त्यांना बाहेर काढण्यात आले. यावेळी ठेवीदार देवाजी निकम, सोमनाथ वराडे, महेंद्र आहेर आदींसह सचिव शरद आहेर आदी उपस्थित होते.