तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीची दाहकता तब्बल १७ तासानंतरही कायम असल्याचे दिसून आले. शेतीच्या बांधांवर गारांचा खच दिसून आला आहे. गारपिटीमुळे कांदा, पपई, टरबूज, टोमॅटो पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शासकीय कर्मचारी संपावर असल्याने पंचनाम्यांविषयी साशंकता आहे. शुक्रवारी सायंकाळी एक तासापेक्षा अधिक वेळ तालुक्यातील आष्टे, गोगळपाडा, सुतारपाडा, ठाणेपाडा यासह इतर गावांमध्ये झालेल्या गारपिटीस सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचे झाले.

हेही वाचा >>> घोटी, माणिकखांब रेल्वेव्दार दोन दिवस बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काढणीला आलेला कांदा आडवा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पपई, टरबूज, खरबूज, गहू, मका, हरभरा, टोमॅटो यांनाही अवकाळीचा फटका बसला. दुसरीकडे पंचनाम्यासाठी कोणी येत नसल्याची चिंता  शेतकऱ्यांना आहे. सरकारी कर्मचारी संपावर असल्याने या पिकांचे पंचनामे करणार तरी कोण, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरसकट मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आष्टे परिसरात नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागातील सरकारी कर्मचाऱ्यांना तत्काळ पंचनाम्यासाठी येण्याची मागणी केली असून संघटनांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे शेतकऱ्यांना नुकसानीचे फोटो काढून ठेवण्याचा पर्याय सूचविण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.