लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक – ओम नमो शिवाय… बम बम भोले, अशा गजरात शिवभक्तांनी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यातील शिवमंदिरांमध्ये गर्दी केली. दुपारनंतर जोरदार पाऊस सुरु झाल्यानंतरही भाविकांच्या उत्साहात कोणतीही कमतरता आली नाही. शिवनामाचा गजर, डमरुचा नाद, घुंगरू काठीच्या ठेक्यात शिवभक्तांनी तिसऱ्या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा उत्साहात पूर्ण केली.

त्र्यंबकेश्वर येथे रविवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. भर पावसात शिवभक्तांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेत कुशावर्तावर स्नान केले. त्यानंतर ब्रम्हगिरी प्रदक्षिणेची वाट धरली. मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी झाली होती. त्र्यंबकेश्वर येथे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी एक हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रदक्षिणा मार्गावर सोमवारी सकाळपासून विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे पदार्थ, केळी, चहाचे वाटप सुरू होते. दिवसभर पडणाऱ्या पावसाची कोणतीही फिकीर भाविकांच्या चेहऱ्यावर दिसली नाही. प्रदक्षिणा करणाऱ्यांमध्ये वयोवृध्दांसह मुलांचाही समावेश होता. युवावर्गाची तसेच महिलांची संख्याही लक्षणीय होती. बहुसंख्य जणांनी रविवारी रात्रीपासूनच प्रदक्षिणेला सुरुवात केली. सोमवारी दिवसा प्रदक्षिणेला जाणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती.

हेही वाचा >>>नाशिककरांनी शांतता राखावी, छगन भुजबळ यांचे आवाहन

गोदाकाठावरील श्री कपालेश्वर मंदिरात पावसातही भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी देवस्थानच्या वतीने श्रींच्या मुखवट्याची मिरवणूक काढण्यात आली. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. सोमेश्वर देवस्थान, निलकंठेश्वर महादेव मंदिर यासह अन्य शिवमंदिरामध्ये सायंकाळी उशीरापर्यंत गर्दी होती. अनेक शिवमंदिरांमध्ये प्रसादाचे वाटप, भजन महोत्सव अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जादा बससेवा

तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी पाहता त्र्यंबकेश्वरसाठी २७० जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. यात नाशिक ते त्र्यंबकसाठी १९०, अंबोली ते त्र्यंबकसाठी एक , पहिने ते त्र्यंबकसाठी १०, घोटी ते त्र्यंबकसाठी १०, खंबाळे ते त्र्यंबकसाठी ५० अशा २७० बसच्या माध्यमातून फेऱ्या करण्यात आल्या.