स्मार्ट सिटी कंपनीने महापालिका आणि खासगी कंपनीच्या सहकार्याने नव्याने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक सायकल प्रकल्पास अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. ज्या थांब्यावर या सायकल उभ्या केल्या जातात, तिथे ‘चार्जिग’ची व्यवस्था नसल्याने चार्जिगसाठी दररोज त्यांची ने-आण करण्याची कसरत करावी लागत आहे.

शहरात सायकल शेअरिंग प्रकल्पांतर्गत १०० थांब्यांवर एक हजार सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात ४५ हजारहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. साधारणत: दररोज दीड हजार नागरिक या सायकलचा वापर करतात. या उपक्रमास प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने याच धर्तीवर इलेक्ट्रिक सायकलच्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या टप्प्यात पाच थांब्यांवर प्रत्येकी पाच यानुसार २५ इलेक्ट्रिक सायकली ठेवण्यात आल्या आहेत. पंचवटीतील महापालिकेचे कार्यालय, दिंडोरी नाका, शासकीय रुग्णालय, प्रमोद महाजन उद्यान, जेहान सर्कल, पालिका मुख्यालय येथील थांब्यांवर इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध आहेत. परंतु या ठिकाणी इलेक्ट्रिक सायकलसाठी चार्जिगची सुविधा नसल्याने सकाळी थांब्यांवर सायकली नेणे आणि सायंकाळी उशिरा परत आणण्याची कसरत करावी लागत आहे. सायकलची व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीपीएस यंत्रणा बंद असल्याने सायकल नेण्यात येत असल्याची साशंकता होती. परंतु त्यांची जीपीएस यंत्रणा सुरू असल्याचे स्मार्ट सिटी कंपनीने नमूद केले आहे. दररोज सायंकाळी थांब्यावरून सायकली नेण्याचे कारण चार्जिगमध्ये दडलेले आहे. थांब्यावर चार्जिगची व्यवस्था करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम झाल्यानंतर सायकलची ने-आण करावी लागणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

अर्ध्या तासासाठी २० रुपये

इलेक्ट्रिक सायकल तीन प्रकारांत ती चालविता येते. तिचा सर्वाधिक वेग ताशी २५ किलोमीटर आहे. एकदा बॅटरी चार्ज केली की सायकल ३० किलोमीटर चालते. देशातील ही पहिली ई सायकल असून सहा थांब्यांवर ती उपलब्ध केली जाणार आहे. तूर्तास पालिका मुख्यालयासह एकूण पाच स्थानकांवर त्या उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक सायकलसाठी अर्ध्या तासाला ३० रुपये भाडे आकारणीचा प्रस्ताव होता. परंतु त्यात कपात करून अर्ध्या तासाला २० रुपये भाडे निश्चिती करण्यात आली. या सायकलसाठी मासिक पास १७५ रुपये, एकदिवसीय पाससाठी २३ रुपये आकारणी करण्याचे निश्चित झाले आहे. तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आकारणीचे दर अद्याप निश्चित नाहीत.