लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: अल निनोच्या प्रभावाने पावसाळा लांबण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेने शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीच्या सादर केलेल्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. टंचाईच्या संभाव्य संकटावर मंगळवारी मंत्रालयातील बैठकीत चर्चा होईल. त्याआधारे याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. तूर्तास शहर आणि ग्रामीण भागात जिथे पाणी गळती होत आहे, ती युध्दपातळीवर थांबविणे आणि नादुरुस्त विंधन विहिरी प्राधान्याने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणी टंचाईबाबत पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, मालेगाव अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे आदी उपस्थित होते. प्रारंभी मनपा, जिल्हा परिषद आणि पाटबंधारे विभागाने टंचाईबाबतचे नियोजन सादर केले. धरणांमधील पाणी जुलैअखेर तहान भागवेल यादृष्टीने आधीच नियोजन आहे. आता हे पाणी ऑगस्ट अखेरपर्यंत कसे पुरविता येईल, यावर चर्चा करण्यात आली.
आणखी वाचा- जळगाव: कापसाला प्रतिक्विंटल १३ हजार रुपये भावासाठी भडगावात आंदोलन
नाशिक मनपाने दर शनिवारी पाणी कपात करण्याचा प्रस्ताव दिला आहे. शहरात दररोज पाणी पुरवठा होतो. मालेगावात एक दिवसाआड तर ग्रामीण भागात चार-पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो. आजपासून प्रत्येक ठिकाणी पाणी बचत केल्यास उपलब्ध साठ्याचा महिनाभर अधिक वापर करता येईल. पाणी पुरवठ्याचा कालावधी काही मिनिटांची कमी करण्याचा पर्याय दिला गेला. या संदर्भात अंतिम निर्णय घेताना लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष व नागरिकांनाही विश्वासात घेतले जाईल. सुट्टीच्या दिवशी नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
जलसाठ्याचे नियोजन करताना पिण्यासह उद्योग, शेती व जनावरांचाही विचार करण्यात येईल. याबाबत गाव पातळीवर देखील सूक्ष्म नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर बैठका घ्याव्यात, असे सूचित करण्यात आले. टंचाई काळात गाव पातळीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न करावे. पाण्याचा अपव्यव होणार नाही यासाठी जनजागृती केल्यास त्याचा लाभ पुढील काळात होईल. पशुसंवर्धन खात्याने जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी तर शिक्षण विभागाने उष्णतेची परिस्थिती लक्षात घेऊन शाळांचा कालावधी व त्यांच्या वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. संभाव्य टंचाई काळात कमी पाऊस झाल्यास किंवा उशिराने पाऊस आल्यास त्या काळात कोणती पिके घेणे फायदेशीर ठरेल, त्या अनुषंगाने कृषी विभागाने आराखडा तयार करावा. वाढत्या उष्णतेचा आरोग्यावर होणारा विपरित परिणाम लक्षात घेऊन संभाव्य आजारांबाबत आरोग्य विभागाने सतर्कता बाळगुन उपाय योजनांची तयारी करावी, असे भुसे यांनी म्हटले आहे. संभाव्य निर्माण होणाऱ्या टंचाईकडे सकारात्मकपणे पाहून संघवृत्तीने विकासात्मक कामे करण्यावर भर देण्यात यावा, असेही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.