जळगाव : शहरातील शतकोत्तर परंपरा लाभलेली दगडी बँकेची जुनी इमारत विकण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतल्यानंतर ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांनी त्यास तीव्र विरोध केला. प्रत्यक्षात, बुधवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दगडी बँकेची इमारत विकण्यावर शिक्कामोर्तब झाले.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली. त्यात दगडी बँकेच्या ब्रिटिशकालीन इमारत विक्रीचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला. सरकारी नोंदणीकृत मूल्य निर्माता यांच्याकडून आलेल्या इमारतीच्या मूल्य अहवालाची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय सदर बैठकीत घण्यात आला. दगडी बँकेची जुनी इमारत विकण्यासाठी ६५०० चौरस फूट चटई क्षेत्रासाठी सुमारे ४० हजार रुपये प्रति चौरस फूट दर निश्‍चित केला आहे. त्यानुसार संपूर्ण इमारतीचे एकूण मूल्य १२ कोटी आणि त्यावर अतिरिक्त १५ कोटी रूपये घेण्याचे संचालक मंडळाने यापूर्वीच ठरवले आहे. अटी-शर्ती टाकून जिल्हा बँकेने जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे संचालकांच्या बैठकीत ठरले.

दरम्यान, जिल्हा सहकारी बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता कुठल्याही प्रकारे स्वत:च्या मालमत्ता विकण्याची गरज नाही. त्यानंतरही दगडी बँकेच्या पुरातन इमारतीची विक्री करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यास आपला विरोध असल्याचे खडसे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. स्वतः खडसे यांच्या बंधुंचे निधन झाले असल्याने संचालक मंडळाच्या बुधवारच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. बैठकीत इतर कोणी दगडी बँक इमारतीच्या विक्री प्रक्रियेला विरोध दर्शविला नाही. बैठकीदरम्यान, सहकार आयुक्तांची परवानगी घेऊन रखडलेली नोकर भरती मार्गी लावण्याच्या विषयावरही एकमत झाले.

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सध्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याकडे असून, प्रमुख संचालकांत आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील यांच्यासह महायुतीचे घटक पक्ष भाजपचे मंत्री संजय सावकारे, शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील, किशोर पाटील आदी बऱ्याच तोलामोलाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विरोधात राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, प्रदेश सरचिटणीस ॲड.रवींद्र पाटील आदी बोटावर मोजण्याइतके संचालक तेवढे आहेत. असे असताना, विद्यमान संचालक मंडळाने अलिकडे काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये दगडी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी पेठेतील शाखेच्या ब्रिटीशकालीन इमारतीच्या विक्रीचाही समावेश आहे.

दगडी बँकेची जुनी इमारती विकताना शेतकऱ्यांचे आणि ठेवीदारांचे भले कसे होईल, याचा विचार केला गेला आहे. ज्येष्ठ संचालक एकनाथ खडसे यांचा गैरसमज झाला असून, तो दूर केला जाईल. -संजय पवार (अध्यक्ष, जळगाव जिल्हा सहकारी बँक)