नाशिक : अवघ्या काही तासांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सजले असून यंदा गणेश मूर्तीसह सजावटीच्या साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ असली तरी भक्तांच्या उत्साहावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नाशिककरांमुळे मेनरोड, कानडे मारुती लेन, रविवार कारंजा ही मध्यवर्ती बाजारपेठ गजबजली आहे. बाजारपेठेत वेगवेगळय़ा स्वरूपातील मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असून लहान मुलांना गणपतीच्या या वैविध्यपूर्ण मूर्ती अधिकच आकर्षित करीत आहेत.
यंदा करोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने विघ्नहत्र्या श्रीगणेशाच्या स्वागतासाठी भक्तांसह विक्रेत्यांनीही जय्यत तयारी केली आहे. शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा विविध साहित्यांसह रोषणाईच्या माळांनी सजल्या आहेत. विक्रेत्यांनी पेण, मध्य प्रदेश, लालबाग येथून गणेश मूर्ती आणल्या आहेत. मूर्तीमधील वेगळेपण यंदा भाविकांना आकर्षित करीत आहे. विशेषत: लहान मुलांची आवड लक्षात घेऊन त्याप्रमाणे मूर्ती बाजारात आल्या आहेत. बालगणेश, तीन चाकी सायकल चालविणारा, हत्तीशी खेळणारा, कॅरम खेळणारा, मोदक कवटाळून बसलेला, अशी गणेशाची अनेक रूपे मूर्तीमध्ये साकारण्यात आली आहेत. यंदा १५ ते २० टक्क्यांनी सजावटीच्या साहित्यांच्या दरात वाढ झाली आहे. असे असतानाही नाशिककरांचा उत्साह कायम आहे.
सजावटीचे साहित्य प्रामुख्याने मेनरोड आणि कानडे मारुती लेन परिसरात मिळत असल्याने या ठिकाणी चालणेही मुश्कील होण्याइतपत गर्दी झाली आहे. सजावटीच्या साहित्यातही अनेक नवीन प्रकार उपलब्ध झाले आहेत. त्यात वेगवेगळय़ा प्रकारच्या माळांचा अधिक समावेश आहे. अनेकांकडून गणेश मूर्ती नोंदणीला प्राधान्य देण्यात आले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेकांनी बाप्पाला आधीच घरी नेले आहे.
वेगवेगळय़ा स्वरूपातील मूर्ती हे यंदाच्या गणेशोत्सवासाठी सजलेल्या बाजारपेठेचे वैशिष्टय़े म्हणावे लागेल. (छाया- यतीश भानू)
मिठाईवर आता मिठाई तयार केल्याची तारीख व त्याची अंतिम मुदत बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसारच आता प्रत्येक मिठाई दुकानदारापर्यंत याबाबतच्या सूचना दिल्या आहेत जर नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.
-पी. आर. सिंगरवाड, सहआयुक्त,अन्न व औषध प्रशासन, ठाणे.