scorecardresearch

दीपक पाण्डेय यांचा भोंग्याबाबतचा आदेश रद्द; पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचा निर्णय

भोंग्यावरून राजकीय वातावरण तापल्याने शहरातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांनी ३ मेपर्यंत भोंग्यांबाबत रीतसर परवानगी घ्यावी अन्यथा या मुदतीनंतर विनापरवाना सर्व भोंगे जप्त करण्याचा तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी काढलेला आदेश नवीन पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रद्द केला आहे.

mosque loudspeakers in bjp ruled states

नाशिक: भोंग्यावरून राजकीय वातावरण तापल्याने शहरातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांनी ३ मेपर्यंत भोंग्यांबाबत रीतसर परवानगी घ्यावी अन्यथा या मुदतीनंतर विनापरवाना सर्व भोंगे जप्त करण्याचा तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी काढलेला आदेश नवीन पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रद्द केला आहे. प्रचलित शासकीय धोरण लक्षात घेता शहरात स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाण्डेय यांच्या आदेशात मशिदीच्या १०० मीटरच्या परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे अजानच्या वेळेत हनुमान चालीसा किंवा अन्य धार्मिक गाणी प्रसारणास प्रतिबंध घातले गेले होते. नव्या आदेशाने सर्वच बाबी रद्दबातल ठरल्याचे अधोरेखित होत आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत जाहीर केलेल्या भूमिकेनंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मशिदींवरील भोंग्यांमुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असूून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरला आहे. सुन्नी मर्कजी सिरत समितीने मशिदीत नमाजसाठी भोंग्यावरून दिली जाणारी अजान ही मुस्लीम धार्मिक परंपरा असून ती अबाधित राखण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर, तत्कालीन पोलीस आयुक्त पाण्डय़े यांनी उपरोक्त आदेश काढले होते. त्यांच्या आदेशाची राज्यभरात चर्चा झाली. त्यावर राजकीय पक्षांनी परस्परविरोधी मत व्यक्त केले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भोंग्यासंदर्भात खास आदेश काढणाऱ्या पाण्डय़े यांची नंतर काही दिवसात बदली झाली. त्यांच्या या आदेशाचा शहरातील स्थिती लक्षात घेऊन नवीन पोलीस आयुक्तांकडून आढावा घेण्यात आला. शहरातील परिस्थिती आणि प्रचलित शासकीय धोरण विचारात घेऊन शहरात स्वतंत्र आदेशाची आवश्यकता नसल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या आधारे राज्य सरकारने भोंग्यांचा वापर, याकरिता लागणारी परवानगी, अटी आणि शर्ती, वेळ आणि आवाजाची मर्यादा याबाबत सविस्तर तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत. या निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचे शासन धोरण आहे.  त्यामुळे १७ एप्रिल रोजीचा आदेश रद्द केला जात असल्याचे पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी म्हटले आहे.

काय होता आधीचा आदेश?

मनसेला मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा कुठलाही प्रस्थापित प्रथांचा अधिकार नाही. त्यांच्यामार्फत केवळ सामाजिक तेढ आणि धार्मिक तंटा करण्याच्या हेतूने हे कृत्य होत असल्याचा ठपका पाण्डय़े यांनी ठेवला होता. मशिदीच्या १०० मीटरच्या परिसरात अजानच्या वेळी तसेच अजानच्या १५ मिनिटे आधी आणि १५ मिनिटे नंतर हनुमान चालीसा किंवा अन्य धार्मिक गाणी भोंग्याद्वारे प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली होती. प्रत्येक मशीद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च किंवा इतर धार्मिक स्थळ व्यवस्थापकांना भोंगे किंवा ध्वनिक्षेपक यंत्र लावण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे अर्ज करण्यास सांगण्यात आले  होते. सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी तीन मेपर्यंत परवानगी घेण्याची मुभा आहे. त्यानंतर परवानगी नसणारे भोंगे जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पाण्डय़े यांनी सूचित केले होते. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस अधिनियमान्वये कारवाई केली जाईल. ज्यात कमीतकमी चार महिने तुरुंगवास आणि एक वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर अन्य कलमाद्वारे तडीपारीची कारवाई केली जाईल, असे सूचित करण्यात आले होते. त्यांचा हा आदेश रद्द झाला आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deepak pandey order canceled decision police commissioner ysh

ताज्या बातम्या