नाशिक – कविवर्य नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असतांना त्यांचे स्वप्नातील वाचनालय माझे विद्यापीठचा प्रवास दिवसागणिक खडतर होत चालला आहे. शहरातील मायको फोरम येथील लहानशा जागेत सध्या कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय आहे. वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांकडून यंदा नवीन जागेत वाचनालयाच्या कामाला सुरुवात होणार असा दावा करण्यात येत आहे.
कविवर्य नारायण सुर्वे यांनी आपल्या लेखणीतून अस्वस्थ मनाची स्पंदने टिपत असतांना वंचिताच्या प्रश्नांवर आवाज उठवला. त्यांच्या अमूल्य अशा साहित्य संपदेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयास सध्या वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे महापालिकेकडून खुटवडनगर परिसरात जागा मंजूर होऊन आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी त्या जागेवर अद्याप वाचनालय उभारणीचे काम सुरु होऊ शकलेले नाही. परिणामी, सुर्वे यांच्या स्वप्नातील माझे विद्यापीठ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रवास खडतर झाला आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात येत आहे. कामगारबहुल सिडको वसाहत परिसरात मायको फोरमने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांची आखणी केली. या उपक्रमांशी नारायण सुर्वे यांची नाळ जुळली.
फोरमने वाचन संस्कृतीसाठी वाचनालय सुरू करण्याचे ठरवले. यासाठी जागा ठरली ती सिंहस्थ नगर मधील मायको फोरममधील काही भाग. १९९८ मध्ये सुर्वे यांच्या सहकार्याने वाचनालय सुरू झाले. वाचनालयाचे उद्घाटन सुर्वे यांच्या हस्ते झाले. वाचनालयास मिळणारा प्रतिसाद पाहता सुर्वे यांनी आपली साहित्यसंपदा, त्यांना मिळालेले पुरस्कार वाचनालयाला सुपूर्द केले. पुरस्काराचा हा ठेवा २००७ मध्ये कलादालनाच्या माध्यमातून खुला झाला.या काळात सुर्वे यांचे वास्तव्य नाशिकमध्ये होते. नंतर ते मूळगावी परतले. दरम्यान, वाचनालयाच्या वतीने सुर्वे यांच्या पश्चात त्यांच्या स्मृतींची जपवणूक व्हावी यासाठी महापालिकेकडे जागा मागितली. त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने खुटवड नगर येथील आम्रपाली लॉन्सनजीकची १२८६ चौरस मीटर जागा मंजुर केली. त्या ठिकाणी सुरूवातीला अतिक्रमण होते. ही जागा ताब्यात आल्यावर तांत्रिक अडचणी तसेच निधीच्या कमतरतेमुळे २०२५ उलटले तरी जागेवर अद्याप काम सुरु होऊ शकले नाही.
याविषयी सुर्वे वाचनालयाचे पदाधिकारी राजु देसले यांनी माहिती दिली. वाचनालयासाठी महापालिका किंवा अन्य कोणीही आर्थिक मदत केलेली नाही. याठिकाणी सुर्वे यांच्यासह अन्य ज्येष्ठ साहित्यिकांची ग्रंथसंपदा असलेले वाचनालय, एकल महिलांसाठी निवास व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, सांस्कृतिक केंद्र आदी उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. कामगारबहुल भागात हे सुरू होत आहे. यासाठी कामगारांना किमान पाच रुपयांची आर्थिक मदत करा, असे आवाहन करण्यात येणार आहे. लवकरच या ठिकाणी भूमिपूजन होईल, असा विश्वास देसले यांनी व्यक्त केला.
नाशिक येथे मायको फोरमच्या जागेत कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय आहे. सुर्वे यांनी माझे विद्यापीठ असे भव्य वाचनालय असावे, असे स्वप्न पाहिले होते. असे वाचनालय उभारणीसाठी जागा मिळून आठ वर्षांचा कालावधी उलटूनही त्या जागेवर काम सुरु झालेले नाही. त्यामुळे सुर्वेप्रेमींमध्ये आणि साहित्यप्रेमींमध्ये नाराजी आहे.