नाशिक – मेच्या मध्यापासून ते अगदी नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत प्रदीर्घ काळ मुसळधार पावसाची अनुभूती घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यात अखेर थंडीची चाहूल लागली आहे. सलग दोन दिवसांपासून वातावरणात चांगलाच गारठा पसरला आहे. तापमान नीचांकी पातळी गाठत असून गुरुवारी नाशिकचा पारा १८.२ अंशावर आला. या दिवशी सकाळी प्रथमच शहर व ग्रामीण भागावर धुक्यांची दुलई पसरल्याचे पहायला मिळाले. धुक्यात हरवलेल्या नाशिकचे फोटोसेशन व छायाचित्रण करण्यात नाशिककरांची लगबग सुरू होती.
यंदा पावसाचा हंगाम बराच लांबला. पावसाने निरोप घेतल्यानंतरही अवकाळीने अलीकडेपर्यंत अस्तित्व कायम ठेवले. सततच्या पावसाने अनेक दिवस सूर्य दर्शनही होत नव्हते. वातावरणातील घटनाक्रमाचा थंडीवर परिणाम होतो की काय, अशी साशंकता व्यक्त होऊ लागली. कारण, थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये एरवी दिवाळीनंतर थंडी जाणवू लागते. तशी स्थिती आता निर्माण झाल्यामुळे थंडीचे आगमन आणि पावसातून सुटका झाल्याची भावना उमटत आहे. नाशिकमध्ये बुधवारी १८ अंशाची नोंद झाल्यानंतर गुरुवारी म्हणजे सहा नोव्हेंबर रोजी १८.२ अंश तापमान नोंदले गेल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी याच दिवशी तापमान यापेक्षा कमी म्हणजे १६ अंश होते.
हवेत चांगलाच गारवा जाणवत असून गुरुवारी भल्या सकाळपासून शहर व ग्रामीण भागात सर्वत्र दाट धुके पसरले होते. गोदावरी काठावर नदी दृष्टीपथास पडत नव्हती. रस्त्यांवर वाहनांना दिवे लावणे भाग पडले. धुक्यांच्या दुलईत नाशिक हरवल्याचे लक्षात येताच अनेकांची हे दृश्य टिपण्याची चढाओढ सुरू झाली. इमारतीच्या गच्चीवर जाऊन काहींनी फोटोसेशन केले. तर काहींनी गोदावरी नदीवरील जवळचा पूल गाठला. धुक्यात हरवलेली गोदावरी कशी दिसते, याची छायाचित्रे व छायाचित्रण केले. काही वेळातच समाजमाध्यमांवर धुक्यात हरविलेल्या नाशिकच्या छायाचित्र व छायाचित्रणाची गर्दी झाल्याचे दिसत होते.
अकस्मात धुके निर्माण होण्याची कारणमिंमासा हवामानशास्त्र विभागातील वैज्ञानिक अधिकारी वैशाली वडनेरकर यांनी केली. हवेतील आर्द्रता वाढलेली असताना तापमान कमी झाल्यास वातावरणात बदल होऊन धुके तयार होते. गुरुवारी सकाळी ही स्थिती निर्माण झाली. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ९४ टक्के होते. तर तापमान १८.२ अंश होते. यामुळे सर्वत्र धुके पसरल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.
