लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे तर उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले यांची बिनविरोध निवड झाली. निकालानंतर महिनाभराने ही निवडणूक पार पडली. समितीत बहुमत मिळवणाऱ्या पिंगळे गटाला रोखण्यासाठी विरोधी चुंबळे गटाने बरीच धडपड केली होती. न्यायालयाने त्यास चाप लावत निवडणुकीचा मार्ग खुला केला. प्रत्यक्ष निवडणुकीत चुंभळे गट उतरला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली.

बाजार समितीच्या निवडणुकीत माजी खासदार देविदास पिंगळे आणि त्यांचे कट्टर विरोधक शिवाजी चुंभळे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली होती. त्यात पिंगळे यांच्या पॅनलने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवले. चुंभळे गटाला सहा जागा मिळाल्या. निकालानंतरही दोन्ही गटात शह-काटशहाचे राजकारण रंगले होते. काही मुद्यांवर न्यायालयात धाव घेतली गेली. या निवडणुकीपूर्वी चुंभळे यांनी पिंगळेंसह तत्कालीन संचालक मंडळावर बाजार समितीचे नुकसान केल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. अपिलात त्यांची सुटकाही झाली. यावर तक्रारदाराने पणन मंत्र्यांकडे अपील दाखल केले.

हेही वाचा… धुळे: सुरक्षारक्षकाला कोंडून मंदिरात चोरी; सात लाख रुपयांचा ऐवज लंपास

मुख्यमंत्री तथा पणनमंत्री शिंदेनी सुनावणी घेत निवडणुकीला स्थगिती देत जिल्हा उपनिबंधकाना याबाबत कारवाईचे निर्देश दिले. जिल्हा उपनिबंधकांनी २५ मे रोजी सुनावणी ठेवली होती. यावर पिंगळे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांनी केलेले आदेश व जिल्हा उपनिबंधकांनी तत्परता दाखवत काढलेल्या नोटिसा यावर स्थगिती दिली. त्यामुळे बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा… जळगाव: सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना अटक; १९ गुन्ह्यांची कबुली

शनिवारी सकाळी ११ वाजता सभापती, उपसभापती पदाची निवडणूक उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितिन मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. यावळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभापती पदासाठी देविदास पिंगळे व उपसभापती पदासाठी उत्तम खांडबहाले यांचे एकमेव अर्ज विहित मुदतीत प्राप्त झाले. चुंभळे गटाचे सदस्य उपस्थित होते. पण त्यांच्याकडून दोन्ही पदांवर उमेदवार दिला गेला नाही.

हेही वाचा… मालेगाव : पाण्यासाठी माळमाथ्याचा हंडा मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मुंडावरे यांनी सभापतीपदी देविदास पिंगळे व उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले हे विजयी झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर होताच चुंभळे गटाने नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींना शुभेच्छा देऊन सभागृह सोडणे पसंत केले. पिंगळे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. बाजार समितीवर पिंगळे गटाने पुन्हा वर्चस्व प्राप्त केले असले तरी चुंभळे गटाचे सहा सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे समितीचा कारभार करताना त्यांचे आव्हान कायम राहणार आहे.