धुळे : एखाद्या परीक्षेत सलग तीन – चार वेळा अपयश आले म्हणून काय झाले, खचून न जाता ठरवलेले ध्येय कसे गाठता येते याचे उदाहरण म्हणून नुकतीच चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या महिमा बहादुरगे हिच्याकडे पाहता येईल.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतलेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले.या अंतिम परीक्षेत धुळे येथील महिमा बहादुरगे हिने यश मिळविले. महिमा ही परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातील बस कंडक्टर महेंद्र बहादुरगे यांची मुलगी आहे. महिमा हिने पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.) ही कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण करून धुळे शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या महिमाने केवळ स्वतःच्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे स्वप्न साकार करत संपूर्ण शहराचा अभिमान वाढवला आहे.
पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण तिने धुळे येथील जयहिंद हायस्कूलमध्ये पूर्ण केले. ९४ टक्के गुण घेऊन गुणवत्ता यादीत झळकलेल्या महिमा बहादुरगे हिने पुढे अकरावी आणि बारावीचे शिक्षण धुळे येथीलच झेड. बी.पाटील वाणिज्य महाविद्यालयात घेतले. मार्च २०१९ मध्ये बारावीच्या परीक्षेतही महिमा ९२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. सलग दोनदा गुणवत्ता यादीत चाललेल्या महिमा हिने गुणवान विद्यार्थिनी म्हणून शैक्षणिक क्षेत्रात आपली छाप पाडली. त्यानंतर तिने २०२२ या शैक्षणिक वर्षात धुळ्यातल्याच विद्यावर्धिनी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली आणि महिमा ही जणू चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी सज्ज झाली. कारण बारावी नंतरच तिने सी.ए. फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण होऊन चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या प्रवासाची सुरुवात केली होती.
उल्लेखनीय बाब म्हणजे एकीकडे कोविड काळ साऱ्यांसाठीच प्रचंड चिंतेचा असताना महिमा हिने मात्र याच काळात संधी म्हणून ऑनलाईनच्या माध्यमातून सी.ए. इंटरमिजिएट परीक्षेची तयारी सुरू केली होती. या कठीण परीक्षेत तिला तीन ते चार वेळा अपयश आले तरी जिद्दी महिमा हिने हार मानली नाही. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अखेर ती २०२४ मध्ये सी.ए. इंटरमिजिएट उत्तीर्ण झाली आणि आर. बी. शर्मा अँड कंपनीत (छत्रपती संभाजीनगर) आर्टिकलशिपसाठी कार्यरत झाली. सकाळी लवकर उठून ऑनलाईन लेक्चर, दिवसभर ऑफिसमध्ये काम आणि रात्री पुन्हा अभ्यास अशी तिची सलग दीड वर्षांची दिनचर्या होती. पहिल्याच प्रयत्नात सी.ए. फायनल उत्तीर्ण होणे हेच तिचे एकमेव ध्येय होते यामुळे सुट्टीतही तिने आणखी जोमाने अभ्यास केला. याचे फलित तिला मार्च २०२५ मध्ये लाभले.
महिमा म्हणते “या यशाबद्दल मला स्वतःला कायम शंका आणि चिंता वाटत होती, पण अशी काळजी आपल्याला यशापर्यंत घेऊन जाते असा आत्मविश्वास आज लाभला, आजचे यश मिळण्यामागे माझ्या स्वतःच्या कुटुंबासह मित्रपरिवाराचा सततचा पाठिंबा आणि प्रोत्साहन हेही खूप मोठे आणि महत्वाचे कारण आहे. केवळ यामुळेच आपण दृढ संकल्प करून तो सिद्धीस नेऊ शकलो. या यशात आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे”
महिमाचे वडील महेंद्र बहादुरगे हे धुळे आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत असून मर्यादित उत्पन्नातही त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून दोन्ही मुलांनीही त्यांच्या स्वप्नांना आकार दिला आहे. महिमाचा भाऊ हितेश बहादुरगे नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा उत्तीर्ण होऊन सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून निवडला गेला आहे, तर आता महिमा हीपण “चार्टर्ड अकाउंटंट” बनली आहे.
या यशाबद्दल आगारप्रमुख पंकज देवरे, मनोज पवार, चंद्रकांत गोसावी, रामेश्वर चत्रे, भोलाशंकर सगरे, गोपाळ ठाकरे, रवि नागणे, तुषार सरोदे, भरत वाघरे (कामगार कल्याण केंद्र प्रमुख), वामन मोहिते यांच्यासह अनेकांनी महिमा आणि तिच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. महिमा बहादुरगे हिचे यश हे सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी निर्धार, चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे महिमाने दाखवून दिले आहे.
