धुळे – तरुणीचे धर्मांतर करून दुसरा विवाह केल्याच्या आरोपाची खात्यांतर्गत चौकशी झाल्यानंतर प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून एका पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही कारवाई केली आहे.

शाकिब शेख असे बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून एक अपत्य आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाकिब शेख हा १८ जून २०१७ रोजी जिल्हा पोलीस दलात भरती झाला. पाच नोव्हेंबर २०२३ रोजी त्याचा पहिला विवाह रश्मीन शेख हिच्याशी झाला. विवाहानंतर या दाम्पत्याला एक अपत्यही झाले. यानंतर शाकिबने एका परधर्मीय तरुणीचे धर्मांतर करुन तिचे नाव माही शेख असे ठेवले. तिच्याशी एक जानेवारी २०२५ रोजी त्याने विवाह केला.

कायद्याची सर्व माहिती असतांनाही शाकिबने दुसरा विवाह केल्यानंतर त्याचे प्रकरण उघडकीस आले. सहा जानेवारी २०२५ रोजी सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी प्राथमिक चौकशी करून १४ जानेवारी २०२५ रोजी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात शाकिबविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात शाकिबबरोबर त्याचे वडील अलीम शेख आणि आई शबाना शेख यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. दोन जानेवारी २०२५ रोजी शाकिबला सेवेतून निलंबित करण्यात आले. आणि २४ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक करण्यात आली.

दरम्यान, २८ जानेवारी २०२५ रोजी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी विभागीय चौकशी पूर्ण करुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना अहवाल सादर केला. यानंतर अधीक्षक धिवरे यांनी सात महिन्यांत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन शाकिब शेख यास सेवेतून बडतर्फ करण्याची प्रशासकीय प्रक्रिया वजा कारवाई पूर्ण केली. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दल चर्चेत आले आहे.

धुळे जिल्हा पोलीस वेगवेगळ्या कारणांमुळे कायमच चर्चेत असते. जिल्ह्यात अमली पदार्थांची होणारी तस्करी असो, महामार्गावरील लुटमार असो. ग्रामीण पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळविले असले तरी गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात पोलीस अद्याप यशस्वी झालेले नाहीत. धुळ्यात महिला आणि युवतींची छेडछाड रोखण्यासाठी अलीकडेच पोलिसांनी नवीन उपक्रम सुरु केला आहे. त्याचे महिला आणि युवतींकडून स्वागत करण्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अशा प्रकारचे उपक्रम सतत राबवावेत, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे. धुळे शहरात बंद घरे हेरुन घरफोडी करण्याचे प्रकार घडत असतात. त्याविषयी पोलिसांनी जनजागृती करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.