धुळे – जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसामुळे पिकांबरोबरच घरांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागल्याने पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेतली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत. अशा सूचना पालकमंत्री रावल यांनी धुळे जिल्हा प्रशासनास दिल्या.

मंगळवारी अवकाळी पावसाबरोबर गारपिटीमुळे साक्री व शिरपूर तालुक्यासह इतर ठिकाणीही शेतपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर काही भागांमध्ये रस्त्यांवर झाडे व वीज तारा पडल्या. अशा ठिकाणी तातडीने झाडे हटवून रस्ते मोकळे करावेत. तसेच वीज तारा दुरुस्त करून खंडित वीजपुरवठा सुरळीत करावा, महसूल, कृषी, पशुसंवर्धन, वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करुन सर्व नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

दरम्यान, प्रशासनाकडून लवकरात लवकर पंचानामे पूर्ण करुन मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येईल, असे धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

दरम्यान, शिरपूर तालुक्यात मंगळवारी वादळी पाऊस, गारपीटमुळे अनेक गावांत झालेल्या नुकसानीची प्राथमिक पाहणी करून पंचनामे करण्याचे काम तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे. अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा या आमदारांसह पालकमंत्र्यांनी पंचनामे करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार शिरपूर तालुक्यातील मौजे करवंद, बाळदे, जातोडे, उंटावद, भोरखेडा, भावेर, खरदे, आढे, सावळदे, पिंपरी, आमोदे, दहीवद, असली, कळमसरे, अजंदे, वाघाडी, अर्थे, लौकी, टेम्भे, तरडी या गावात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे. तसेच करवंद व वाघाडी या भागात तहसीलदार महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी केळी व पपईच्या नुकसान झालेल्या फळबागेची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांनी केळी व पपई फळपिकांचा पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर आपल्या नुकसानीबाबत (सूचना) द्यावी, असे आवाहनही तहसीलदार (शिरपूर) महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.