धुळे : एसी गाडीत बसून राहतात. काजू, बदाम खातात. आणि सकाळी नऊ वाजले, की पोटशुळ सुरू होणाऱ्यांनी शासनाने दिलेल्या मदतीची चिंता करू नये, अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिव्हसना (उध्दव ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांच्यावर केली. साक्री तालुक्यातील भाडणे शिवारातील पांझरा कान सहकारी साखर कारखान्याच्या आवारात गुरुवारी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा झाला. यावेळी पांझरा कान सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीचे प्रमुख तुळशीराम गावित, आमदार मंजुळा गावित यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. बंद अवस्थेतील पांझरा कान साखर कारखाना स्पायका ग्रीन ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चालवण्यासाठी घेतला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मंत्री दादा भुसे यांनी, ऑक्टोंबर २०२६ मध्ये कारखान्याची चाके प्रत्यक्ष फिरू लागतील. आणि साखरेचे पहिले पोतेही बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त केला. पांझरा कान साखर कारखाना सुरू होत असल्यामुळे हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून शेकडो कामगारांना रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात जाहीर केलेल्या पॅकेजवरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले.
महायुती सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून घोषित केलेल्या निधी संदर्भात तुम्ही चिंता करू नका, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातात का नाही, ते तुम्ही पहा. शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले खासदार राऊत स्वतः मात्र एसी गाडीत बसून राहतात. काजू – बदाम खातात. सकाळी नऊ वाजले, की त्यांना पोटशुळ सुरू होते, त्यामुळे शासनाने दिलेल्या मदतीची त्यांनी चिंता करू नये. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही, मात्र आजवरच्या इतिहासात सर्वाधिक मदत याच सरकारने दिली आहे.
एनडीआरएफच्या निकषांपेक्षाही जास्तीची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिल्याचा दावा मंत्री भुसे यांनी केला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे पडतील. २३ वर्षांपासून बंद असलेला धुळे जिल्ह्यातील पांझरा कान सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू होणार असून हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे सुतोवाच मंत्री भुसे यांनी केले.