धुळे : जिल्हा पोलिस दलात विविध आरक्षण प्रवर्गांकरिता एकूण १३३ पदे भरली जाणार आहेत.यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०२२ आणि शासनाच्या २७ ऑक्टोबर २०२५ च्या सुधारित आदेशानुसार पोलीस अधीक्षक, धुळे यांच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण १३३ पदे विविध आरक्षण प्रवर्गांकरिता भरली जाणार आहेत. धुळे जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस भरती पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज सादर करावा. या भरतीअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ईडब्ल्यूएस, ईएसईबीसी तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

धुळे जिल्ह्यातील १३३ पदांचे आरक्षण असे – अनुसूचित जाती १३, अनुसूचित जमाती ३५, विमुक्त जाती (अ) ५, भटक्या जमाती (ब) ४, भटक्या जमाती (क) १, भटक्या जमाती (ड) ५, विमाप्र २, इमाव २१, ईएसईबीसी १२, ईडब्ल्यूएस २१ आणि अराखीव १७ पदे. या पदांमध्ये सर्वसाधारण ४१, महिला ३७, खेळाडू ६, प्रकल्पग्रस्त ७, माजी सैनिक १९, अंशकालीन कर्मचारी १४ आणि गृहरक्षक दल ९ उमेदवारांसाठी पदांचा समावेश आहे.

जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रियेदरम्यान कोणाही व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास किंवा लाच मागितल्यास उमेदवारांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे संपर्क साधावा. तसेच उमेदवार पोलीस अधीक्षक, धुळे यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अध्यक्ष, पोलीस भरती समिती यांच्याशी थेट तक्रार करू शकतात असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

पोलीस भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी आणि शंका निरसनासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीबाबत महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि दस्तऐवज पडताळणीसाठी वेळेत तयारी ठेवावी असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील हजारो युवक आणि युवती पोलिस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.अनेकांचा मोठ्या मैदानावर सराव सुरू असून काही निवृत्त पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन घेत येते आहे. पोलीस भरती प्रक्रिया कशी असेल याबद्दल अनेक जन माहिती करून घेत आहेत तर अनेकांनी याआधी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता ते आपापल्या मित्रांना माहिती देत आहेत. याआधी झालेल्या पोलिस भरती नंतर मोठा कालावधी गेल्याने जिल्ह्यातील इच्छुक पोलिस भरतीकडे डोळे लावून बसले होते.अखेर पोलिस भरतीची घोषणा झाली आणि इच्छुकांमध्ये उत्साह निर्माण झाला.