धुळे : समाज माध्यमात गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या तीन जणांविरुध्द धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या तसेच एखादा गुन्हेगार जामिनावर सुटताच त्याच्या नावाने जयघोष करणाऱ्यांविरुध्दही आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे.समाज माध्यमात मृत गुन्हेगार रफिउद्दीन शेख उर्फ गुड्या आणि विक्रम गोयर उर्फ विकी बाबा गोयर या गुन्हेगारांचे आणि अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण करणाऱ्या चित्रफिती आणि संदेश प्रसारित झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास करुन जयप्रकाश देसले (रा.माळीच, ता.शिंदखेडा, धुळे), अविस शेख (रा. जनता सोसायटी,धुळे) आणि परवेज पठाण (रा.खाटकीवाडा, एकविरा देवीरोड, धुळे) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ज्या माध्यमांतून संबंधितांनी आक्षेपार्ह संदेश प्रसारित केले, त्यांचा सायबर पोलीस ठाण्याच्या ‘सोशल मिडीया मॉनिटरींग सेल’ मार्फत शोध घेण्यात येतो. तपासणीत दोषी असलेल्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते.
त्या अनुषंगाने सदर पथकातील अधिकारी-कर्मचारी यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाद्वारे (इंस्टाग्राम,फेसबुक) गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्याऱ्या तिघांविरुध्द कारवाई केली. धुळ्यात पहिल्यांदाच अशी कारवाई झाली आहे.जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांचा जल्लोष, मिरवणूक, शस्त्र प्रदर्शन यास कायद्याने बंदी आहे. धुळ्यासह जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांवर पोलीस कठोर करावी करतात. त्यांना पुढे शिक्षा होते. काही जणांची जामिनावर सुटका होताच त्यांचे चित्रीकरण करण्यात येते.
गुन्हेगारीचे समर्थन करणाऱ्या गाण्यांचे संगीत देऊन जमिनीवर सुटलेल्या गुन्हेगारांच्या दादागिरीला एकप्रकारे प्रोत्साहन दिले जाते. समाज माध्यमात त्यासंदर्भातील चित्रफिती आणि संदेश टाकले जातात. काही ठिकाणी तर जामिनावर सुटलेल्या आरोपींची जल्लोषाने मिरवणूक काढण्यात येते. एवढेच नाही तर, शस्त्र प्रदर्शन,फटाक्यांची आतषबाजी आणि अनेकदा गाणी, संगीत असा कार्यक्रम होतो. समाजात दहशत पसरविणाऱ्या चित्रफिती समाज माध्यमात टाकण्याचे प्रकार वाढीस लागले असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हेगारांच्या ‘स्नेही जणां’कडून हा प्रकार घडत असल्याचे उघड होऊ लागल्याने आता पोलीस कारवाईचा मोर्चा अशा “दादा समर्थक” संभाव्य उदयोन्मुख दादांकडे वळला आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सायबर पोलिसांचे गुन्हेगारांच्या कारवाईवर बारकाईने लक्ष आहे. अशा प्रकारच्या चित्रफिती समाज माध्यमात टाकणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. सामान्य नागरिकांनी अशा प्रकारांपासून दूर राहुन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर, चाळीसगावरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक समाधान वाघ, सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, प्रतिक कोळी, भुषण खलाणेकर,विवेक बिलाडे,तुषार पोतदार,हेमंत बागले यांच्या पथकाने केली.