धुळे – मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या धुळेकरांना दिलासा देण्यासाठी गुरुवारपासून महापालिकेतर्फे मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण तसेच लसीकरणाची मोहीम सुरू होत आहे. कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेची या मोहिमेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी शहरातील वरखेडी रोडवर ॲनिमल बर्थ कंट्रोल सेंटर (एबीसी सेंटर) कार्यान्वित करण्यात आले असून, तेथे ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे.
धुळेकरांची मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून मुक्तता करण्याच्या हेतूने आमदार अनुप अग्रवाल यांनी महापालिकेला सूचना केली होती. शहरात काही वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव धुळेकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकांसह अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी धुळेकरांकडून करण्यात येत होती.
मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया ही केंद्र शासनाची संस्था नियंत्रण व मार्गदर्शन करते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत प्राणी कल्याण संघटना, संस्थांनाच करण्याची परवानगी आहे. त्यानुसार कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेला हे काम देण्यात आले आहे. या मोहिमेस गुरुवारपासून प्रारंभ होत असून, वरखेडी रोडवरील एबीसी सेंटरमध्ये संस्थेतर्फे मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करणे, शस्रक्रियेनंतर तीन-चार दिवस त्यांचे संगोपन करणे, त्यानंतर मोकाट कुत्र्यांना जेथून नेले होते तेथे सोडण्यात येणार आहे.
धुळे शहरवासीयांनी महापालिकेच्या या मोहिमेला सहकार्य करावे, परिसरात उघड्या जागांवर उष्टे अन्न फेकू नये, हाड-मांस टाकू नये, मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून सावधगिरी बाळगावी, आपल्या लहान मुलांसह ज्येष्ठांना एकटे सोडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.