धुळे– साहेब म्हणून शाळेस भेट देण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी शिस्त, शालिनता आणि हजरजबाबीपणा या गुणांची दोन दिवस आधीच विद्यार्थ्यांकडून उजळणी करून घेण्यात येते. येणारे साहेबही आपला साहेबीपणा दाखविण्यासाठी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारतात. परंतु, धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहिरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी वेगळाच साहेब अनुभवला. साहेबीपणाचा थाट सोडून आलेल्या साहेबाने विद्यार्थ्यांशी मित्र बनून आत्मीयता आणि जिव्हाळा दाखवत संवाद केल्याने विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले.
वरिष्ठ अधिकारी एखाद्या ग्रामीण भागातील शाळेला भेट देणार असल्याची माहिती आधी मिळाल्यावर त्या शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वेगळेच दडपण येत असते. अधिकाऱ्यांसमोर शाळेतील काही हुषार विद्यार्थ्यांची आधीच तयारी करुन घेतली जाते. परंतु, काही अधिकारी आपले वेगळेपण जपून असतात. त्यापैकी एका अधिकाऱ्याच्या कार्यशैलीचा अनुभव धुळे जिल्हा परिषदेच्या अंजनविहिरे येथील शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी घेतला.
“आनंददायी शनिवार” या उपक्रमातंर्गत धुळे जिल्हा परिषदेच्या अंजनविहिरे येथील शाळेत गट शिक्षणाधिकारी डी. एस. सोनवणे यांनी अकस्मात भेट दिली. धुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविला जातो. त्याअंतर्गत अंजनविहिरे शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. गट शिक्षणाधिकारी सोनवणे यांनी शाळेतील वेगवेगळ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. शिक्षणाधिकारी येणार याची कुणालाही पूर्वकल्पना नसतांना सोनवणे हे शाळेत धडकताच मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. विद्यार्थीही आधी धस्तावले होते. परंतु, त्यांनी विद्यार्थ्यांना ‘मी तुमचा साहेब नाही. आणि तुम्ही माझे विद्यार्थी नाहीत ‘ असे आश्वस्त केले. त्यामुळे काही मिनिटात विद्यार्थ्यांवरील दडपण दूर झाले.
गटशिक्षणाधिकारी सोनवणे यांच्या उपस्थितीत वह्या वाटप झाल्यावर त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी लेखन उपक्रम आणि स्काऊट-गाईडची प्रार्थना म्हटली. यावेळी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना शालेय आणि स्काऊट-गाईडच्या गणवेशासह बूट,शैक्षणिक पुस्तके व अन्य साहित्य वितरणाविषयी माहिती घेतली. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्यासह अन्य महापुरुषांच्या जीवनावर चर्चा झाली. शनिवारी विद्यार्थ्यांना दिला जाणारा पूरक आहार आणि इतर दिवशी देण्यात येणारा पोषण आहार, विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती, पटावर संख्या यांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
शिक्षकांची भूमिका आणि जबाबदारी निभावणाऱ्या विद्यार्थिनींची शैक्षणिक प्रगती सोनवणे यांनी यावेळी जाणून घेतली. अनेक विद्यार्थ्यांच्या खांद्यावर हात ठेवून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची कौटुंबिक परिस्थिती समजावून घेतली.आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करा, अशा शब्दांत सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुकही केले. गुणवान विद्यार्थी ही शिक्षकांनी केलेल्या अध्ययन आणि अध्यापणाची खरी पावती असते, असे ते म्हणाले. मुख्याध्यापक राजेश ठाकूर, सहशिक्षक ईश्वर ढिवरे, वैजयंती ढिवरे, स्वप्निल सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला.