जळगाव : जिल्ह्यातील काही मातब्बरांबरोबर राष्ट्रवादीमधून (शरद पवार) अजित पवार गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांचेही नाव काही दिवसांपूर्वी घेतले गेले होते. मात्र, वाघ यांनी ऐनवेळी सावध भूमिका घेत आपली भाजपकडे ओढ असल्याचे ठामपणे सांगितले होते. त्यानुसार, मंगळवारी भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला.

माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि डॉ.सतीश पाटील यांच्यासह काही माजी आमदारांबरोबर दिलीप वाघ हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात दोन्ही माजी मंत्र्यांसह दोनच माजी आमदारांनी त्यावेळी प्रवेश केला. वाघ हे अजित पवार गटाच्या प्रवेश सोहळ्याकडे फिरकलेही नाहीत. त्यांच्या त्या संदिग्ध भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असताना, आपण अजित पवार गटात जाणार असल्याची निव्वळ अफवा होती, असा दावा त्यांनी नंतर केला होता. याशिवाय, आपण सध्या कोणत्याच पक्षात नाही. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील असून, पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी नमूद केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर, मंगळवारी मुंबईत माजी आमदार वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या बरोबर त्यांचे बंधू पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा नगर परिषदेतील माजी गटनेते संजय वाघ, पंचायत समितीचे माजी सदस्य ललित वाघ व इतर समर्थकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये वाघ यांच्यासह त्यांच्या समर्थकांमुळे भाजपची ताकद आणखी वाढण्याची चिन्हे असली, तरी विधानसभेत आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पाचोऱ्यात उमेदवारी केलेले दिलीप वाघ यांना भाजपने पक्षात घेतल्याने शिवसेना (एकनाथ शिंदे) दुखावली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.