नाशिक : भारतीय सैन्य दलातील जवानांमध्ये बंड घडवून आणण्याचा व त्यांना कर्तव्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न करणे, सैनिकांना वरिष्ठांवर हल्ला करण्यास चिथावणी देणे, गणवेश नियमावलीचे उल्लंघन या प्रकरणी पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर बडतर्फ झालेला जवान चंदू चव्हाण याच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत तोफखाना दलातील नायब सुभेदार सचिन गुंजाळ यांनी तक्रार दिली. वर्षभरापासून धुळ्यातील मोहाडी येथील बडतर्फ जवान चंदू चव्हाण हा समाज माध्यमात भारतीय सैन्य दलाबाबत खोटी व बदनामीकारक चित्रफिती प्रसारित करीत आहे.
स्वतची यू ट्यूब वाहिनी सुरू करीत तो बडतर्फीचे भलतीच कारणे पुढे करतो. देशासाठी शहीद झालेल्या जवानांना नंतर कोणीही विचारत नाही. काही शहीदांच्या कुटुंबियांना शासकीय निवासस्थानातून लगेच काढले गेले. देशात १५ लाख बडतर्फ केलेले जवान असून त्यांच्यावर अन्याय होतो, अशा प्रकारे चुकीची व अर्धवट माहितीची विधाने त्याने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बडतर्फींनंतर सैन्य दलाचा गणवेश परिधान करण्यास प्रतिबंध आहे. असे असताना संशयित चव्हाण गणवेश परिधान करून मुंबई, दिल्ली, लखनौ भागात फिरतो. गळ्यात फलक परिधान करून, भिक मागून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याकडे तक्रारीत लक्ष वेधण्यात आले.
लष्करातील व निम लष्करी दलातील बडतर्फ जवानांची संघटना तयार करण्याचे आवाहन करीत संबंधितांना सोबत घेऊन त्याच्याकडून केंद्र व राज्य शासनाविरोधात बिनबुडाचे आरोप केले जातात. बडतर्फीच्या कारवाई विरोधात त्याला दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग उपलब्ध आहे. परंतू, तो मार्ग न अवलंबता जनतेला चुकीची माहिती देऊन न्याय देण्याचे आवाहन करतो. संशयिताकडून सैन्य दलात कर्तव्यावर असलेल्या जवानांमध्ये बंड घडवून आणण्याचा व त्यांना कर्तव्यापासून विचरित करण्याचा प्रयत्न होत आहे. वरिष्ठांविषयी वारंवार अपशब्द वापरून व त्यांच्याविषयी अपप्रचार करून सैनिकांना वरिष्ठांवर हल्ला करण्यास चिथावणी देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी विविध कलमांन्वये चंदू चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. बी. शिरसाठ यांनी दिली.
चंदू चव्हाणची पार्श्वभूमी
सप्टेंबर २०१६ मधील उरी हल्ल्यास भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ला करीत प्रत्युत्तर दिले होते. त्याच सुमारास जवान चंदू चव्हाण सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला होता. सुमारे चार महिने तो पाकिस्तानच्या तावडीत होता. या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत लष्करी न्यायालयाने त्याला ८९ दिवसांची शिक्षा सुनावली. नंतर त्याला बडतर्फ करण्यात आले.
यापूर्वीही एक गुन्हा
चंदू चव्हाणची पाकिस्तानातून सुटका करण्यात तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रयत्न केले होते. चंदू चव्हाण हा डॉ. भामरे यांच्या लोकसभा मतदारसंघातील मोहाडीचा रहिवासी आहे. लोकसभा निवडणुकीत समाजमाध्यमांद्वारे त्याने भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ संदेश दिले होते. धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसारित केले होते. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी चंदू चव्हाणविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वी गन्हा दाखल झालेला आहे.