नाशिक – मराठा समाजातील युवकांच्या उद्यमशीलतेला बळ देणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्यातील वाद उफाळून आले आहेत. व्यवस्थापकीय संचालकांनी जाणीवपूर्वक महामंडळाचा कारभार संथ केला, पोर्टल बंद ठेवले, असे आरोप अध्यक्ष पाटील यांनी केले. व्यवस्थापकीय संचालक देशमुख यांनी हे आक्षेप तथ्यहीन ठरवत महामंडळाचे सर्व कामकाज सुरळीत असून केवळ वेब प्रणालीचे अद्ययावतीकरण प्रगतीपथावर असल्याचा दावा केला आहे.
साधारणत: दोन ते अडीच महिन्यांपूर्वी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देशमुख यांनी स्वीकारली. अल्पावधीत अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यात बेबनाव निर्माण झाला. मराठा समाजातील संघटनांनी विविध समस्या मांडल्यानंतर अध्यक्ष पाटील यांनी त्यास राष्ट्रवादीचे नेते आणि व्यवस्थापकीय संचालक देशमुख यांना जबाबदार धरले. संबंधितांनी महामंडळाचे काम जाणीवपूर्वक संथ केले. पोर्टल महिनाभरापासून बंद आहे. अनेक महिन्यांपासून लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळाला नाही. महामंडळाचे राज्यात दीड लाखहून अधिक लाभार्थी आहेत. व्याज परतावा वेळेवर न दिल्यास ते अडचणीत येऊन त्यांची कर्ज खाती एनपीए होऊ शकतात. ऑनलाऊन पोर्टल बंद असल्याने सणोत्सवात मराठा समाजाच्या युवकांना पात्रता प्रमाणपत्र मिळू शकले नाही. सणोत्सवात मालमोटार, टेम्पो, मोटार, ट्रॅक्टर आदींची खरेदी केली जाते. पात्रता प्रमाणपत्राअभावी सुमारे १५ हजार मराठा युवकांना झळ बसली. व्यवस्थापकीय संचालकांच्या अखत्यारीत संपूर्ण व्यवस्था चालते. संबधितांनी जाणीवपूर्वक प्रमाणपत्र देण्याचे काम थांबवल्याचा आरोप अध्यक्ष पाटील यांनी केला.
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी अध्यक्षांचा नामोल्लेख न करता होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता महामंडळाचे सर्व कामकाज सुरळीत आहे. कोणत्याही राजकीय, दिशाभूल करणाऱ्या किंवा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
१० ऑक्टोबर २०२५ पासून वेब प्रणालीचे अद्ययावतीकरण हाती घेण्यात आले. दलालांमार्फत लाभार्ध्यांची होणारी फसवणूक थांबावी, यासाठी महामंडळाने सीएससी केंद्राद्वारे केवळ ७० रुपयांत सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी करार केला आहे. त्या अनुषंगाने प्रणालीत आवश्यक ते बदल केले जात आहेत. लाभार्थ्यांना सर्व सेवा भ्रमणध्वनीद्वारे देण्यासाठी ॲप विकसित होत आहे. यापूर्वी व्याज परताव्या कामी लाभार्थ्यांना एकावेळी तीन दावे सादर करता येत होते. सध्या ते एकाचवेळी कमाल सहा दावे सादर करू शकतात. मागील चार महिन्यात दिलेला व्याज परतावा आणि महामंडळाने दिलेली पात्रता प्रमाणपत्र यांची आकडेवारी देत व्यवस्थापकीय संचालक देशमुख यांनी अध्यक्षांचे आक्षेप खोडून काढले.
