पावसाळी वातावरण आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात होणाऱ्या आंदोलनाची धास्ती

हिवाळा म्हणजे पर्यटनासाठी अनुकूल हंगाम. त्यातच नाताळच्या सुट्टीची भर पडत असल्याने अनेक जण पर्यटनासाठी या काळात बाहेर पडतात. त्यासाठी दिवाळीच्या सुट्टीनंतर व्यावसायिकांकडे नोंदणी होण्यास सुरुवात होते. यंदा मात्र दिवाळीपर्यंत असलेले पावसाळी वातावरण आणि सध्या देशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात होणारे आंदोलन, पर्यटन व्यावसायिकांच्या मुळावर आले आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे सध्या तरी पर्यटनासाठी बाहेर जाण्याचा बेत अनेकांनी रहित केला आहे.

नागरिकत्व दुरुस्तीविरोधात देशभर ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. अशांतता निर्माण झाल्याने याचा परीणाम  नाताळच्या सुट्टीतील पर्यटनावर झाला आहे. संपूर्ण उत्तर भारत, आसाम, दिल्ली, कोलकाता येथील परिस्थिती अधिक बिघडली आहे. ऐन नाताळच्या उंबरठय़ावर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यटन व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. दिवाळीच्या सुट्टीतील पर्यटनावर अवकाळी पावसाने पाणी फेरले. आता नाताळच्या सुट्टीनिमित्त होणारा व्यवसायही कोरडा जाण्याची चिन्हे असल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. देशातील काही राज्यांची अर्थव्यवस्था मोठय़ा प्रमाणात पर्यटनावर अवलंबून असल्याने अशा राज्यांना या परिस्थितीचा मोठा फटका बसणार आहे.  गोवा, केरळ, राजस्थान, अंदमान या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर परदेशी पर्यटकही येतात. वास्तविक भारतात नाताळचा कालावधी हा वर्षभरात पर्यटनासाठीचा सुलभ काळ मानला जातो. नाताळच्या सुट्टीत पर्यटक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडतात. या वर्षीही अनेकांनी व्यावसायिकांकडे पर्यटनासाठी आगाऊ आरक्षण केले आहे. परंतु, अचानक उद्भवलेल्या अस्थिर परिस्थितीमुळे पर्यटकांकडून नोंदणी रद्द केली जात आहे. त्यामुळे हॉटेल आणि पर्यटन व्यावसायिकांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ लागला आहे. जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून १५० ते  २०० बसगाडय़ा  गंगासागर, जगन्नाथ पुरी यात्रेला जातात. संपूर्ण भारतातून हजारच्या आसपास खासगी बसगाडय़ा या भागात यात्रांसाठी जात असतात. या यात्रांचा १० ते  ३० दिवसांपर्यंत  प्रवास कालावधी असतो. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बंगाल आणि  ओडिशातून हा प्रवास असतो. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत या यात्रा होणार की, नाही यावर प्रश्नचिन्ह असल्याचे पर्यटन व्यावसायिक सांगतात.

परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणावी लागेल. हे लोण देशभर पसरणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कायद्याच्या अंमलबजावणीवरून देशात निर्माण झालेला असंतोष भारताची प्रतिमा बाहेरील देशात खराब करत आहे. याचा परिणाम पर्यटनासह इतर घटकांवरही होत आहे. – दत्ता भालेराव, पर्यटन व्यावसायिक, नाशिक