नाशिक – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकाविरोधात दाखल तक्रारीवर सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी तब्बल ३० लाखांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्यासह वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील खरे यांच्या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अलीकडेच निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात सहकार विभागाकडे एक प्रकरण दाखल आहे. त्यावर सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे (५७) व मध्यस्ती वकील शैलेश सभद्रा (३२) यांनी ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम निवासस्थानी आणून देण्यास सांगितले होते. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. आई हाईट्स इमारतीतील निवासस्थानी तक्रारदाराकडून ३० लाख रुपये स्वीकारताना खरे व वकील शैलेश सभद्रा या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

हेही वाचा – मालेगाव शिक्षण मंडळाचे वादग्रस्त प्रशासनाधिकारी चव्हाण निलंबित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचखोरीत जिल्हा उपनिबंधकासारखा बडा अधिकारी अडकण्याची जिल्ह्यातील ही बहुदा पहिलीच वेळ असावी. त्यामुळे सहकार वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांसाठी काही दिवसांपूर्वीच निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. अनेक समित्यांमध्ये दोन्ही गटांनी परस्परांविरोधात सहकार विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. अशाच एका प्रकरणात खरे यांनी लाचखोरीचे हे उद्योग केल्याचे दिसून येते. संशयित खरे व वकील सभद्राला पथकाने ताब्यात घेतले. अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली खरे यांच्या निवासस्थानाची झडती सुरू करण्यात आली.