जळगाव – जिल्हा पोलीस दलातर्फे आगामी सण-उत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सकाळी ऑपरेशन वॉश आऊट राबविण्यात आले. त्या माध्यमातून विविध गंभीर गुन्ह्याशी संबंधित तब्बल ८४ गुन्हेगारांना पोलिसांनी तीनच तासांत जेरबंद केले.
जिल्हा पोलीस दलाने कायदा सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राखण्यासाठी नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबविली. ज्याद्वारे वेगवेगळ्या ठिकाणाहून १० देशी बनावटीच्या गावठी बंदुका आणि २४ जीवंत काडतुसे जप्त करून १२ संशयितांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पैकी बऱ्याच संशयितांवर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून, त्यादृष्टीने पुढील तपासाला गती देण्यात आली आहे. त्यानंतर गुरूवारी सकाळी तीन ते सहा वाजेच्या दरम्यान गाढ झोपेत असलेल्या गुन्हेगारांवर झडप घालण्यासाठी पोलीस दलाने जळगाव शहरात ऑपरेशन वॉश आऊट राबविले.
जळगाव शहर, जिल्हा पेठ, औद्योगिक वसाहत, जळगाव तालुका आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रित करून सदरची मोहीम राबविण्यात आली. पोलीस दलाने अचानक केलेल्या कारवाईमुळे बऱ्याच दिवसांपासून लपून बसलेल्या गुन्हेगारांची भंबेरी उडाली.
शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी जळगाव पोलिसांनी विशेष मोहिम राबवून मोठी कारवाई केल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांच्या ऑपरेशन वॉश आऊट मोहिमेच्या माध्यमातून हद्दपार केलेले, इतर गुन्ह्यांमधून फरार असलेले, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, घरफोडी करणारे चोरटे तसेच अवैध दारू विक्रेते यांना अटक करण्यात आली आहे. सर्व गुन्हेगार हे संबंधित पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील गंभीर गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि पोलिसांनी त्यांच्यावर ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेषतः परवानगीशिवाय हद्दपार असताना पुन्हा शहरात प्रवेश करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलिसांचे ऑपरेशन वॉश आऊट यशस्वीरित्या पार पडले. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी राबविण्यात आलेल्या या कारवाईचे नियोजन अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी काटेकोरपणे केले.
या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, जिल्हापेठचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनंत अहिरे आणि रामानंदनगरचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह प्रत्येक पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. एकत्रित आणि समन्वित पद्धतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात यश आले. या यशस्वी ऑपरेशनबद्दल पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.