शहरात सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत अवजड वाहतुकीस प्रवेश बंद करण्याचा निर्णय हा वाहतूकदारांवर अन्यायकारक आहे. केवळ अवजड वाहतूक बंद करून शहरातील वाहतुकीचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी शहरात प्रथमतः वाहतुकीबाबत पायाभूत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांची भेट घेतली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे आणि नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, कायदेशीर सल्लागार इंद्रपालसिंग चड्डा, सचिव बजरंग शर्मा, उपाध्यक्ष शंकरराव धनावडे आणि बस संघटनेचे राजुभाई इंदानी, कैलास शेट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
गरवारे ते सातपूर रस्त्यालगत, द्वारका सर्कल, एक्स्लो पॉइंट आणि शहरातील सर्व रस्त्यांवर अतिक्रमण असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्याचा ठपका वाहतूकदारांवर ठेवला जातो. अनेक ठिकाणी वाहन उभे करण्यास मनाईसह आवश्यक माहितीचे फलक नसल्याने अडचण निर्माण होते. याबाबत वाहतूकदारांनी नाराजी व्यक्त केली.
प्रथम मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढावे, वाहतूक विभागाकडून नियमांचे फलक सर्वत्र लावण्यात यावेत, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांविषयी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणील संघटनेच्या वतीने करण्यात आली.
नाशिक शहरातील वाहतूकसंदर्भात उपाययोजना करण्यासह शहराच्या चारही बाजूला मालमोटार आणि बस टर्मिनल विकसित करण्यात यावे, शहरात वाहनतळांची मुबलक सुविधा निर्माण करण्यात यावी, यासह विविध मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. पोलीस प्रशासन याबाबत वाहतूकदारांना सर्वोतोपरी सहकार्य करेल. तसेच सुचविलेल्या उपाययोजनांवर लवकर कारवाई करण्यात येईल, असे सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) नितीन जाधव यांनी सांगितले.
नाशिक शहरातून होणाऱ्या अवजड वाहतूकीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे काही वेळा अपघातही झाले आहेत. याआधीही शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबविण्यासाठी उपाय योजण्यात आले होते. आता शहरात अवजड वाहतूकीमुळे होणारी कोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहतूक काही ठराविक वेळेत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयास नाशिक जिल्हा वाहतूकदार संघटनेने विरोध केला आहे.