नाशिक : नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्यासह राज्य शासनाचे अधिकारी तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची सिंहस्थ कुंभमेळा तयारीसंदर्भात समन्वय बैठक झाली.या बैठकीत कुंभमेळ्यासाठी रेल्वे व्यवस्थापन सुरळीत होण्याकरीता विभागीय समन्वय, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, सुरक्षा आणि अन्य महत्त्वाच्या बाबींवर सखोल चर्चा झाली. या बैठकीस कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.
या धार्मिक सोहळ्यासाठी भुसावळ रेल्वे विभाग संपूर्णपणे सज्ज असून उत्कृष्ट समन्वय, आधुनिक पायाभूत सुविधा व प्रवाशांच्या सोयी सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा यांच्यातील समन्वय आणि पाहणी उपक्रम हे सिंहस्थ कुंभमेळासाठी अपेक्षित लाखो भाविकांना दर्जेदार सुविधा आणि सुरळीत व्यवस्थापन प्रदान करण्याच्या बांधिलकीचे प्रतिक असल्याचे रेल्वेच्या अधिका-यांनी नमूद केले. कुंभमेळ्यासाठी सर्वात जास्त भाविक हे रेल्वेने नाशिकला येतात. त्यामुळे रेल्वेची भूमिका, नियोजन महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाच्या आयआरसीटीसी विभागातर्फे नवरत्न पीएसयू संस्थेने श्री रामेश्वरम–तिरूपती दक्षिण दर्शन यात्रा” या विशेष धार्मिक पर्यटन सहलीची घोषणा केली आहे. ही यात्रा भारत गौरव विशेष पर्यटक रेल्वेव्दारे करण्यात येत आहे. नऊ रात्री आणि दहा दिवसांची ही अध्यात्मिक यात्रा सात नोव्हेंबर रोजी नाशिक रोड स्थानकावरून सुरू होऊन १६ नोव्हेंबर रोजी समाप्त होईल, अशी माहिती आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंह, अमोल हळदणकर यांनी येथे पत्रकारांना दिली.
यात प्रवास, निवास, भोजन व पर्यटनाचा समावेश आहे. नाशिक रोड, देवळाली, इगतपुरी, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी या स्थानकांवर ही गाडी थांबेल. तिरूपती बालाजी आणि देवी पद्मावती मंदिर, रामेश्वरमचे रामनाथस्वामी मंदिर व धनुष्यकोडी, मदुराईचे मीनाक्षी अम्मन मंदिर, कन्याकुमारीचे विवेकानंद रॉक मेमोरियल, गांधी मंडपम व कन्याकुमारी मंदिर, तिरूवनंतपुरमचे पद्मनाभस्वामी मंदिर व कोवलम बीच येथे प्रवाशांना भेट देता येईल. तिरुपती बालाजी दर्शन तिकीट अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरून स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्यक आहे.
दरम्यान, इकॉनॉमी (स्लीपर क्लास) १८,०४०, स्टँडर्ड (३ एसी) ३०,३७० कम्फर्ट (२ एसी) ४०,२४० असे दर ठरविण्यात आले. यामध्ये प्रवाश्यांना निवडलेल्या श्रेणीत प्रवास, हॉटेलमध्ये निवास, प्रवासात तसेच नियोजित स्थळी शुद्ध शाकाहारी भोजन, एसी बसद्वारे स्थानिक दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
