धुळे : ध्वनी प्रदुषण होत असल्याने प्रशासनाने आवाजाच्या भिंतींचा (डीजे) वापर करण्यास बंदी घातल्याने ध्वनी प्रदूषण कमी झाले असले तरी वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. आवाजाच्या भिंती चालकांचे हातचे काम गेल्याने ते धुळ्यात रस्त्यावर उतरले. कायद्याच्या अधीन राहून आवाजाच्या भिंती वापरण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक-मालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शुक्रवारी सकाळी.धुळे शहरातील छत्रपती अग्रेसन महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला. राज्यातील इतर कुठल्याही जिल्ह्यात बंदी नसताना केवळ धुळे जिल्ह्यातच आवाजाच्या भिंतींना (डीजे) बंदी का,असा प्रश्न करून जिल्हा प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे हजारो युवक बेरोजगार झाले असल्याची तक्रार यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळातील सचिन शेवतकर, जिल्हाध्यक्ष ललित वाघ, संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष विक्की चौधरी यांनी केली.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात संघटनेने बाजू मांडली आहे. प्रशासनाने आवाजाची भिंत असलेली वाहने आणण्यासही परवानगी नाकारल्याने सर्वांनी एकत्रपणे पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. राज्यात केवळ धुळे जिल्ह्यातच आवाजाच्या भिंतींवर पोलिसांनी प्रतिबंध घातला आहे. यामुळे हजारो युवक बेरोजगार झाले आहेत. धुळे शहरासह जिल्ह्यात आवाजाच्या भिंती वापरावर पोलीस प्रशासनाने कठोर निर्बंध घातले आहेत. यंदाची गणेश विसर्जन मिरवणूकही यावेळी आवाजाच्या भिंतीशिवाय पार पडली. कठोर बंदीमुळे या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेकडो आवाजाच्या भिंती चालक- मालक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोर्चात आवाजाची भिंत असलेली शेकडो वाहने घेवून येण्याची तयारी डीजे चालकांनी केली होती. तशी परवानगी दिली जावी, अशी मागणीही निवेदनातून पोलीस उपअधीक्षकांकडे करण्यात आली होती. परंतु, पोलिसांनी धुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरुन अशा प्रकारे शेकडो वाहनांसह मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे वाहनांशिवाय मोर्चा काढण्यात आला.जिल्ह्यात आवाजाच्या भिंतीचा वापर पुन्हा सुरु व्हावा, या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला दिले. बंदीमुळे ओढवलेले आर्थिक संकट आणि रोजगाराचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न झाला.
पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल, असे नमते धोरण घेत यावेळी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. आवाजाच्या भिंतीमुळे कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, व्यावसायिकांकडून नियम मोडल्यास प्रशासनाने संबंधिताविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करावी. वेळेचे भान ठेवू, ज्यांच्या कार्यक्रमात आवाजाची भिंत वापरली जाईल, त्यांच्यावरही वेळेचे आणि आवाजाचे बंधन घालावे, अशी जाणीव यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने करून दिली.यावेळी कल्पेश पगारे, दिनेश कापडे, सचिन बडगुजर, भूषण गोसावी,सचिन बडगुजर, बंटी बडगुजर, पंकज बागले आदींसह डीजे चालक मालक संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.