नाशिक : वक्फ विधेयक आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेते तथा खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या टिप्पणीचे कारण देत भाजपशी संबंधित आयोजकांनी ऐनवेळी माघार घेतल्याने बुधवारपासून येथे होणारे शिवपुत्र संभाजी महानाट्याचे सर्व प्रयोग रद्द करण्याची वेळ आली. या महानाट्याचे १२ वर्षात २८५ प्रयोग झाले असून पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याचे नमूद करत कोल्हे यांनी तिकीट घेणाऱ्या प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त केली,

येथील ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने ३० एप्रिल ते पाच मे या कालावधीत दररोज सायंकाळी तपोवनातील बाबूशेठ केला मैदानात शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या महानाट्यात डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह १५० कलाकार सहभागी होणार होते. ऐनवेळी आयोजक संस्थेने अंग काढून घेतल्याने महानाट्याचे प्रयोग रद्द करावे लागले. आयोजक संस्थेचे प्रमुख गोपाळ पाटील हे भाजपशी संबंधित आहेत. महानाट्याचे प्रयोग रद्द झाल्याचे समजल्यानंतर अनोळखी व्यक्तींनी मदतीविषयी विचारणा केल्याचे कोल्हे यांनी सांगितले. तिकीटाचे दर कमी करून एक मेपासून प्रयोग करण्याचे प्रयत्न झाले. मात्र त्यास यश आले नाही. कमी वेळात महानाट्य पूर्ण करणे शक्य नाही. नाटकाच्या तयारीसाठी दोन ते तीन महिने लागतात, असे ते म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट असून ही राजकारण करण्याची वेळ नाही. पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे, या भूमिकेतून संपूर्ण देश पंतप्रधानांच्या पाठिशी उभा असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. कलाकार आणि राजकीय भूमिका यांचा संबंध जोडण्याची गरज नाही. दोन स्वतंत्र गोष्टी म्हणून त्याकडे पाहिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजकीय जोडे घालून महानाट्य करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. महानाट्याचे तिकीट घेणाऱ्या प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करीत परताव्यासाठी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिवपुत्र संभाजी महानाट्याची आम्ही दीड महिन्यांपासून जोरदार तयारी केली होती. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी समाजमाध्यमात केलेल्या टिप्पणीमुळे आम्ही व्यथित झालो. त्यामुळे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला.- गोपाळ पाटील (आयोजक, ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ)