नाशिक – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळ सभागृहात रमी खेळतांनाची चित्रफित आ. रोहित पवार यांनी प्रसारित केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मंगळवारी कोकाटे हे नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांच्यावर शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) काही कार्यकर्त्यांकडून पत्ते फेकण्याचा प्रयत्न झाला. नाशिकरोड पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
सध्या रमी या पत्त्यांच्या खेळाने पिच्छा पुरविलेले कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांनी कितीही आरडाओरड करुन आणि दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असतानाही राजीनामा देण्यास नकार दिला आहे. राजीनामा देण्यासारखे आपण काय केले, असा प्रश्न कोकाटे यांनी उपस्थित केला असला तरी कोकाटे हे आता जिथे जातील, तिथे रमी त्यांची पाठ सोडणार नाही, असे नाशिकरोड येथील घटनेवरुन दिसते.
विधिमंडळाच्या सभागृहात कोकाटे हे भ्रमणध्वनीत रमी खेळत असल्याचे चित्रफीत आ. रोहित पवार यांनी प्रसारित केल्यानंतर कोकाटे यांच्याविरोधात राजकीय आरोपांचा एकच धुरळा उडाला. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधकांच्या आरोपाना कृषिमंत्री कोकाटे यांनी मंगळवारी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यानंतर ते नाशिकरोड येथील दुर्गा मंदिर परिसरात एका कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यावेळी ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न झाला.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख भय्या मणियार, योगेश देशमुख आणि नीलेश शिरसाठ यांचा समावेश आहे. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येत घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरले. या वादामुळे काही काळ परिसरात वाहतूक खोळंबली होती.
दरम्यान, पत्ते फेकणाऱ्या कार्यकर्त्यांनी, आपण सिन्नर तालुक्यातील असल्याचे सांगितले. कोकाटे हे कृषिमंत्री झाल्यापासून त्यांच्याशी दोन वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सिन्नरचे असूनही आम्हाला भेटले नाही. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना वेळ नाही. सिन्नर तालुक्यात जनावरे, पाणी यासह वेगवेगळे प्रश्न आहेत. कोकाटे सिन्नरचे असल्याने त्यांना या प्रश्नांची जाण असेल म्हणून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला. मात्र कोकाटेंशी संपर्क होऊ शकला नाही. मंगळवारी ते कार्यक्रमा निमित्त नाशिक येथे आले होते. त्यावेळी समोरा समोर भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोकाटे आणि वाद कायम बरोबर
माणिकराव कोकाटे यांनी कृषिमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून सुरु झालेली वादाची मालिका संपता संपत नाही. फेब्रुवारी २०२५ मध्ये नाशिक न्यायालयाने ३० वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्ष तुरूंगवास सुनावला. अर्थात त्यानंतर या प्रकरणात दिलासाही मिळाला. अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांसमोर आता ढेकळ्याचे पंचनामे करायचे का, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.