लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : कुंभमेळ्याच्या निमित्ताने परिसरात वाढणारी रहदारी आणि भाविकांच्या गर्दीचा विचार करून नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शहरात येणाऱ्या भाविकांच्या वाहतूक सुविधेसाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.
सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील सभागृहात आढावा घेतला. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, बाह्यवळण मार्गांची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कुंभमेळ्यात मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा मार्गाने भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. त्या मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण करण्यासह त्या रस्त्यांवर वाहनतळांची सुविधा निर्माण करण्यास सांगण्यात आले.
विभागीय आयुक्त आणि पालक सचिव यांनी प्राधान्याने सुरु करावयाच्या रस्त्यांचा आराखडा १० दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करावा. बाह्यवळण मार्ग, परिक्रमा मार्ग, अस्तित्वातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे तातडीने सुरु करावीत. विमानतळ, समृद्धी महामार्ग यांना जोडणाऱ्या मार्गांची कामे युद्धपातळीवर सुरु करावीत, असे सूचित करण्यात आले. शहरातील आवश्यक रस्त्यांची कामे महापालिकेमार्फत नगर नियोजन अंतर्गत घेण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
रहदारी नियोजनार्थ आधुनिक तंत्रज्ञान
नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना उत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्ताव तयार करावा, रहदारीचे योग्य नियोजन करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. केंद्र सरकारच्या ‘शहरी आव्हान निधी’ कार्यक्रमांतर्गत नाशिक शहरातील वाहतूक समस्येचा समावेश करण्यात आला आहे.
५०० हेक्टरचे भूसंपादन
नाशिक बाह्यवळण मार्गातील १३७ किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ‘ग्रीनफील्ड अलाईनमेंट’द्वारे उभारण्यात येणार आहेत. जुन्या नाशिक-मुंबई महामार्गापासून पुढील ६९ किलोमीटरचा मार्ग हा ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’मार्फत बांधण्यात येईल. यातील ४१ किलोमीटरचे रस्ते महापालिका हद्दीबाहेरून जातात. या रस्त्यांसाठी ४० गावांमधील ५०० हेक्टरचे भूसंपादन करावे लागणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.