जळगाव : एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? ती आत्महत्या आहे की हत्या ?, हे मी नाही तर प्रफुल्ल लोढा याने म्हटल्याचा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जामनेरमध्ये केला होता. त्याविषयी प्रतिक्रिया देताना, माझ्यावर एकुलत्या एक मुलाच्या हत्येचा आरोप तुम्ही करता. हिंमत असेल तर संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, असे थेट आव्हान खडसे यांनी आता मंत्री महाजन यांना दिले आहे.
हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा हा सध्या भाजपमध्ये आहे. आणि पूर्वीपासून त्याचे व मंत्री गिरीश महाजन यांचे घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये नुकताच केला. मंत्री महाजन यांनीही खडसे यांना प्रत्युत्तर देताना त्यांचे सर्व आरोप सोमवारी फेटाळून लावले. तसेच एकनाथ खडसे यांची मानसिकता खराब झाली आहे. त्यांचे डोके ठिकाणावर राहिलेले नाही. प्रफुल्ल लोढा याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी खडसे करतात. मग लोढा याने सुद्धा यापूर्वी निखिल खडसे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याबद्दल खडसे का बोलत नाही, असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला होता. खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? ती आत्महत्या आहे की हत्या ?, हे मी म्हणत नाही. ते प्रफुल्ल लोढा याने म्हटल्याचा गौप्यस्फोट देखील मंत्री महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता.
दरम्यान, थेट मुलाच्या मृत्यु प्रकरणाला हात घालणार्या गिरीश महाजन यांच्यावर खडसे यांनीही मंगळवारी पलटवार केला. हिंमत असेल तर माझ्या मुलाच्या मृत्युची सीबीआय चौकशी करा, असे आव्हान देतानाच निखिल याचा मृत्यू झाला तेव्हा तब्बल तीन दिवस मी घरी नव्हतो. त्याच्या मृत्यूच्या दिवशी देखील मी त्याच्या जवळ नव्हतो, असा दावा खडसे यांनी केला. तसेच महाजन यांना लक्ष्य करताना त्यांनी कमावलेल्या संपत्तीवरही खडसे यांनी बोट ठेवले. माझ्याकडे तर शेतीशिवाय काहीच नाही. पण गिरीश महाजन हा एका शाळा मास्तरचा पोरगा असून सुद्धा आज कोट्यवधींचा मालक आहे. एवढा पैसा त्यांच्याकडे आला कुठून?” असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. पत्रकारांशी ते बोलत होते.
मंत्री महाजन यांनी आपली सर्व संपत्ती आपल्या नावावर न ठेवता जावयाच्या नावावर ठेवली आहे. ही सर्व संपत्ती जनतेपासून लपवली जात आहे. तीन बत्ती भागातही महाजन यांचा फ्लॅट आहे. त्याची किंमत किती आहे, याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली. प्रफुल्ल लोढा सोबत हनी ट्रॅपमधे गिरीश महाजन देखील आहे, असा माझा संशय असल्याचेही खडसे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांविषयी मला राग नाही. नाशिकमधील हनी ट्रॅपशी संबंधित व्यक्ती आणि हॉटेल देखील त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी कसून चौकशी करावी. तात्काळ एसआयटी नेमावी, अशी आपली मागणी असल्याचे खडसे म्हणाले.