जळगाव : राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील बंगल्यातून सोने-चांदीसह रोख रकमेची चोरी झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. दरम्यान, चोरट्यांनी सोने-चांदीसोबत सीडी, काही लोकांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असलेली महत्वाची कागदपत्रेही चोरून नेल्याचा दावा खडसे यांनी आता केला आहे. चोरटे नेमके कोणत्या उद्देशाने आले होते, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
आमदार खडसे यांनी चोरीच्या घटनेनंतर बंगल्यातील कपाटांमधून आणखी काही सामान चोरीला गेला आहे का म्हणून बारकाईने पाहणी केली. तेव्हा त्यांना कपाटातून काही महत्वाच्या सीडी गायब झाल्याचे दिसून आले. त्या विषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. चोरट्यांनी चोरून नेलेल्या सीडी फार महत्वाच्या नसल्या तरी कामाच्या होत्या, असे ते म्हणाले.
सोने, चांदी आणि पैशांसोबत सीडी चोरून नेण्यामागे कोणाचा हात आहे का, तुम्हाला कोणावर संशय आहे का, असे प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारले. तेव्हा माझ्याजवळ पुरावे आहेत आणि ते आपण पोलिसांना स्वतःहून देणार आहोत, असे खळबळजनक स्पष्टीकरण त्यांनी दिले.
जळगाव शहरातील मू. जे. महाविद्यालयाच्या परिसरात शिवराम नगरात खडसे कुटुंबियांचा बंगला आहे. संपूर्ण खडसे कुटुंबीय कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथे वास्तव्यास असते. त्यामुळे जळगावमधील त्यांच्या बंगल्यात फारसा कोणाचा वावर नसतो. देखभालीसाठी एका व्यक्तीची नेमणूक केली आहे. ती व्यक्ती सोमवारी रात्री नऊच्या सुमारास बंगल्याची सर्व दारे कुलुपबंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी आवारातील लोखंडी दरवाजासह मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून खडसे यांच्यासह त्यांच्या सून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या खोल्यांमधील सामान अस्ताव्यस्त फेकून सुमारे ६८ ग्रॅम सोने, साडेसात किलो चांदी आणि ३५ हजार रुपये रोख रकमेची चोरी केली.
मंगळवारी सकाळी देखभालीची जबाबदारी असलेली व्यक्ती बंगल्याजवळ आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याने खडसे कुटुंबियांना त्याविषयी तत्काळ माहिती दिली. त्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मुक्ताई बंगल्याचे सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध झाले नसले, तरी आजुबाजुच्या घरांवरील सीसीटीव्हीचे चित्रण पाहून पुढील तपासाला गती दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी दिली. परंतु, आमदार खडसे यांनी त्यांच्या बंगल्यात चोरी झाली त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम सांगून ऐनवेळी परिसरातील पथदिवे कसे बंद झाले, त्यावर संशय व्यक्त केला आहे. चोरटे बंगल्याचे कुलूप तोडून आत शिरण्याच्या काही वेळेआधी परिसरातील पथदिवे बंद झाले. चोरटे चोरी करून पसार झाल्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे पथदिवे सुरू झाले होते, हा सर्व एकूण घटनाक्रम संशयास्पद असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे. चोरीच्या या घटनेमागे कोणाचा हात आहे का, याविषयी थेट भाष्य आपण आताच करणार नाही. मात्र, पोलिसांना माझ्याकडे असलेले पुरावे देणार असल्याचे ते म्हणाले.
