जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांच्या शहरातील बंगल्यातून ६७ ग्रॅम सोने, ७.५ किलो चांदी, ३५ हजार रूपये रोख, सीडी, पेन ड्राईव्ह आणि महत्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, सुमारे सव्वासहा लाखांचे सोने-चांदी हस्तगत केले आहे. मात्र, सीडी आणि कागदपत्रे यांचा काही तपास लागलेला नाही.

आमदार खडसे यांच्या बंगल्यातून सोने, चांदी, ३५ हजार रूपये रोख, सीडी, पेन ड्राईव्ह आणि बरीच काही महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली होती. प्रत्यक्षात, सोने-चांदी आणि पैशांपेक्षा सीडी जास्त चर्चेचा विषय ठरली. जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून काढणाऱ्या त्या सीडीचे गूढ आणखी जास्त वाढले. खडसेंच्या जळगावमधील बंगल्यात चोरी झाल्यापासून कथित सीडी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. सोने, चांदीसह पैशांसोबत सीडी, पेन ड्राईव्ह आणि काहींच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्यांची महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली असताना, वैयक्तिक खडसे यांना सीडी गेल्याचे जास्त दुःख झाले.

चोर नेमके सोने-चांदी चोरण्यासाठी आले होते की सीडी चोरण्यासाठी, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या सर्व प्रकरणामागे कोणाचा राजकीय हात असल्याचा थेट उल्लेख त्यांनी केला नाही. मात्र, आपल्याजवळ बरेच पुरावे आहेत आणि आपण ते पोलिसांना देणार असल्याचे खळबळजनक विधान त्यांनी केले होते.

दरम्यान, खडसे कुटुंबियांच्या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा पडला, तेव्हा मी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौरा कार्यक्रमात होतो. दुसरी चोरी त्यांच्या जळगावमधील बंगल्यावर झाली तेव्हाही मी अमित शहांसोबत होतो. त्यामुळे खडसे माझे नाव घेत असतील तर माझ्याजवळ पुरावा आहे, की मी चार दिवस जिल्ह्याबाहेर होतो. चोऱ्या-माऱ्या करणे काही माझा धंदा नाही. चोरी करणारे उल्हासनगरचे राहणारे होते आणि जळगावात त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते, हे सर्व पोलीस चौकशीत समोर आले आहे. माझे तर काही उल्हासनगरच्या चोरांशी संबंध नाहीत. किंवा मी त्यांना सांगितले सुद्धा नाही की खडसेंच्या घरात चोरी करा म्हणून, असा टोला मंत्री महाजन यांनी हाणला होता.

सीडीचे गूढ आणखी वाढले

आठवडाभरानंतर जळगाव पोलिसांना खडसेंच्या बंगल्यावरून सोने, चांदीची चोरी करणाऱ्या संशयितांना जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वासहा लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला गेला आहे. ज्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह चांदीच्या गणेश मुर्तीचा समावेश आहे. मात्र, खडसेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितल्यानुसार, तिन्ही संशयितांकडून सीडी अथवा कागदपत्रे हस्तगत केली गेलेली नाहीत. त्यामुळे कथित सीडीचे गूढ आणखी जास्त वाढले आहे.