जळगाव : हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढाचे प्रकरण बाहेर आल्यापासून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे सोडताना दिसत नाहीत. तशात आता देवाभाऊंचा आशीर्वाद असेपर्यंतच महाजन यांची किंमत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यावरील हात काढल्यावर गल्लीमध्ये एका कुत्र्याच्या मागे जशी १०० कुत्री लागतात, तशी यांची हालत होणार असल्याची बोचरी टीका खडसे यांनी केली आहे.
जामनेर तालुक्यातील मूळ रहिवाशी असलेल्या संशयित प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत बलात्कार तसेच हनी ट्रॅपसंबंधी इतर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अटक केल्यानंतर त्याच्या जळगाव जिल्ह्यातील संपत्तीची झाडाझडती घेतल्यावर पोलिसांनी लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, भ्रमणध्वनी जप्त केले आहेत. आणखी काही महत्वाचे पुरावे हाती लागण्याच्या शक्यतेने तपासाला गती देण्यात आली आहे.
दरम्यान, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे पूर्वापर घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप करून हे प्रकरण आणखी तापवले आहे. मागील सर्व हिशेब चुकते करण्यासाठी लोढा प्रकरणावरून दररोज नवीन आरोप करून महाजन यांना डिवचण्याचा प्रयत्नही खडसे यांनी केला आहे.
याला जेलमध्ये टाका आणि त्याच्या मागे इडी लावा, अशातला मी माणूस नाही. लढायचे असेल तर आमने-सामने लढा. आतापर्यंत लढलो तर समोरून लढलो, मागून काड्या केल्या नाही. प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर नेहमी राहायचा. त्याचे कोणतेच पुरावा देण्याची गरज नाही. ते कुणीही सांगू शकेल. प्रफुल्ल लोढा याने त्याच्याकडे असलेले पुरावे इतरांना देऊ नये आणि तोंड उघडू नये, यासाठीच त्याला वारंवार पोलीस कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोढा जामीनावर सुटल्यानंतर त्याच्याकडून सत्य बाहेर आले तर यांचा पर्दाफाश होऊ शकतो, असाही गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी आता नव्याने केला आहे. जळगावमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
हनी ट्रॅप प्रकरणात अटक केलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात घटनेच्या १५ दिवसानंतर अंधेरी पोलीस ठाण्यात कशी नोंद झाली ? घटना घडली ती तारीख आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ती तारीख यामध्ये १५ दिवसांचा फरक आहे. एवढे दिवस गुन्हा दाखल करण्यासाठी का लागले ? असे काही प्रश्न खडसे यांनी नव्याने उपस्थित केले आहेत. लोढा याच्याकडून काही मिळण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते नष्ट करण्यासाठीच सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्याकडून काहीतरी मिळेल म्हणूनच त्याला छळणे सुरू असल्याकडेही खडसे यांनी लक्ष वेधले.