जळगाव – मंत्री गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांच्यातील गुलाबी गप्पांवर बोचरी टीका करून त्यासंदर्भातील जुने छायाचित्र नुकतेच व्हायरल केले. त्यानंतर लोढा मला त्यावेळी महाजन यांच्या कर्तृत्वाची सीडी आणि छायाचित्रे त्याच्याजवळ असल्याचे गुलाबी गप्पांमधून सांगत होता, असा दावा खडसे यांनी केला आहे. तसेच महाजन यांनी लोढाची मनधरणी केल्याने कोणतेच पुरावे माझ्या हाती लागले नाही. ती सीडी मिळाली असती तर बरेच काही घडले असते, अशीही खंत खडसे यांनी व्यक्त केली आहे.
हनी ट्रॅप प्रकरणावरून भाजप नेते गिरीश महाजन आणि शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कोणीही मागे हटण्यास तयार नाही. दररोज नवीन आरोप करून दोघेही जिल्ह्यातील नागरिकांची करमणूक करताना दिसत आहेत. याच दरम्यान, महाजन यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत असतानाच खडसे यांनी त्यांच्या मनातील व्यथा पत्रकारांसमोर बोलून दाखवली आहे.
महाजन यांनी व्हायरल केलेल्या छायाचित्रातील गाडीत मीच बसलो आहे आणि लोढा रस्त्यात गुलाबाची फुले देऊन माझेच स्वागत करत होता. मात्र, तेव्हा लोढा मला महाजन यांच्या कारनाम्यांची माहिती सांगत होता. त्याच्याजवळ गिरीश महाजन यांच्या कारनाम्यांचा पुरावा असलेली सीडी आणि छायाचित्रे होती. आणि ती मला तो देणार होता. ज्यामुळे पुढे जाऊन महाजन चांगलेच उघडे पडले असते. मात्र, त्या सीडीचा धोका ओळखून गिरीश महाजन यांनी नंतर प्रफुल्ल लोढा याचे मुंबईतील एका हॉटेलमध्ये तब्बल तीन महिने पाय दाबले. लोढा मला कोणतेच पुरावे देऊन नये म्हणून त्याची मनधरणी केली. आणि त्याला पुन्हा पक्षात घेतले, असाही आरोप खडसे यांनी केला आहे.
प्रफुल्ल लोढा आणि माझ्यामध्ये त्यावेळी गुलाबी गप्पा रंगल्याचे गिरीश महाजन जुन्या छायाचित्राचा आधार घेऊन सांगतात. मात्र, माझे गुलाबी गप्पा करण्याचे आता वय राहिले आहे का, असाही खोचक टोला खडसे यांनी महाजन यांना हाणला.
याशिवाय, भाजपमधील आपला प्रवास आणि पक्षाकडून करण्यात आलेल्या हेटाळणीविषयी बोलताना खडसे भावनिक झाले. मी पक्षासाठी आयुष्य खर्च केले. पण आज ज्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले ते लोक पक्षात टिकून राहिले. आणि आम्ही बाहेर फेकले गेलो. महाजन यांनी मला मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यासाठी षडयंत्र रचले आणि जिल्ह्यातील संस्थांवर ताबा मिळवला. मी मंत्रिमंडळात होतो तोपर्यंत महाजन यांचे वर्चस्व शक्य नव्हते, म्हणूनच हे सर्व घडल्याची व्यथाही खडसे यांनी पत्रकारांसमोर मांडली.