जळगाव: जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांना धक्का बसला असून त्यांच्या पत्नी तथा दूध संघाच्या मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांचा भाजपचे चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी पराभव केला. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२२-२७ या पंचवार्षिकासाठी ही निवडणूक होत आहे. २० संचालकांची निवड करण्यात येणार आहे. पाचोरा तालुका गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ हे बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार निवडणूक आखाड्यात होते. यात महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळसरळ लढत झाली. यातील सहकार पॅनलची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांभाळली, तर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. यात शेतकरी विकास पॅनलमध्ये महाजन आणि पाटील या मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांचा समावेश, तर सहकार पॅनलमध्ये मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्यासह दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी ४४१ मतदार होते. सर्वच्या सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला.

हेही वाचा: सिन्नरजवळील अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

रविवारी शहरातील रिंग रोडवरील सत्यवल्लभ सभागृहात सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीला शेतकरी विकास पॅनलचे अरविंद देशमुख यांनी भटक्या-विमुक्त जमाती प्रवर्गातून आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी अनुसूचित जाती या प्रवर्गातून विजय मिळविला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही विजय झाला. शेतकरी विकास पॅनलची विजयी घोडदौड सुरू असतानाच पराग मोरे यांच्या रूपाने सहकार पॅनलने दूध संघात खाते उघडले. महिला राखीवसाठी असणार्‍या दोन जागांमध्ये दोन्ही पॅनलला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. यात शेतकरी विकास पॅनलच्या पूनम पाटील आणि सहकार पॅनलच्या छाया गुलाबराव देवकर यांचा विजय झाला आहे.
चाळीसगाव गटातून थेट मुक्ताईनगरमध्ये उडी मारत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना आव्हान देत उमेदवारी करणारे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ही प्रतिष्ठेची लढाई जिंकली आहे.

हेही वाचा: मनमाडमधून २४ तलवारींचा साठा जप्त; दोन जण ताब्यात

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा दूध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. यात आमदार चव्हाण यांच्याकडे मुख्य प्रशासकपदाची जबाबदारी होती. या निर्णयाच्या विरोधात खडसे गट न्यायालयात गेले. तेथे या निर्णयाला स्थगिती मिळाली. मात्र, त्यांना प्रशासकपदासाठी ३२ दिवस मिळाले. या काळात आमदार चव्हाण यांनी दूध संघातील अपहाराचे प्रकरण शोधत गुन्हा दाखल केला. यानंतर दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. चव्हाण यांनी खडसे कुटुंबातील सदस्याच्या विरोधात निवडणूक लढविली. प्रचारात अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. चव्हाण यांनी ७६ मतांनी विजय मिळविला. धरणगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार हे महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलतर्फे विजयी झाले. पवार हे २२ वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक आहेत.

हेही वाचा: ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचं निधन

आजपर्यंत सहकार क्षेत्रात प्रवेश न केलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दूध संघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवीत प्रवेश केला आहे. त्यांनी जळगाव सोसायटी गटात महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालतीबाई महाजन यांचा पराभव केला. पाटील हे २५९ इतकी मते मिळवून विजयी झाले. एकीकडे शेतकरी विकास पॅनलची विजयी घोडदौड सुरू असतानाच ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांच्यारूपाने सहकार पॅनलने खाते उघडले आहे. ओबीसी गटात मोरे यांनी शेतकरी विकास पॅनलचे गोपाळ भंगाळे यांच्यावर ३१ मतांनी विजय मिळविला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse suffered big blow jalgaon district milk union election mandakini khadse defeated bjp candidate girish mahajan gulabrao patil tmb 01
First published on: 11-12-2022 at 13:02 IST