आमच्याकडे पन्नास खोके नसले, तरी आशीर्वाद देण्यासाठी लोक आहेत. यामुळे आपण गुवाहाटी येथील कामाख्यादेवीच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहोत. मी दरवर्षी कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो. देवीला परत आमचे सरकार येऊ दे, असे साकडं घालणार असल्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>राहुल गांधींकडून ५० खोक्यांचा उल्लेख, शिंदे गटातील मंत्री दादाजी भुसेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “लोक हसायला…”

जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या-विमुक्त जाती-जमाती आघाडीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर आदींसह तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेत आमदार खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चाळीस आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याच्या विषयावर टीका केली. राज्यात कसला कायदा, कसली सुव्यवस्था, मुख्यमंत्री शिंदे तिकडे मस्तीत आहेत. शिंदे म्हणतात, सर्व आमदारांना घेऊन परत गुवाहाटीला जाणार आहे. जशी प्रेमाची आठवण असते प्रेयसीबरोबरची. आता हे चाळीस खोकेवाले गुवाहाटीला काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते हाटील, या आठवणी ताज्या करण्यासाठी जात आहेत का ? शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवा, सधन मानल्या जाणार्‍या जळगाव जिल्ह्यात तीन महिन्यांत सर्वांत जास्त आत्महत्या झाल्या, तिकडेही लक्ष द्या, असे खडसेंनी सांगितले.

हेही वाचा >>>दोन खासदारांच्या ज्येष्ठतेच्या तिढ्यावर अखेर डॉ. भारती पवार यांच्याकडून तोडगा; जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी खा. हेमंत गोडसे

खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मंत्री महाजन हे माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करतात, तर त्यांच्या पत्नीच्या पदांचे काय, असा प्रश्‍न करीत जामनेरमध्ये कुठल्याही महिला सक्षम नाहीत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जामनेरमध्ये सोनिया गांधी यांच्या २००९ मध्ये झालेल्या सभेने धडकी भरलेल्या आमदार गिरीश महाजन यांनी त्यावेळी माझे पाय धरले होते. त्यामुळे ऐनवेळी बोदवड येथील शत्रुघ्न सिन्हा यांची जाहीर सभा रद्द करून ती जामनेरमध्ये घेण्यात आली आणि महाजन हे निवडून आले; अन्यथा चित्र वेगळेच असते. १९९५ मध्ये जामनेर मतदारसंघ शिवसेनेकडे होता, तर भुसावळ मतदारसंघ भाजपकडे होता. त्यावेळी मी पुढाकार घेऊन जामनेर भाजपसाठी बदलून घेत गिरीश महाजन यांच्या नावाची शिफारस केली होती, असे खडसे म्हणाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse will go to guwahati to visit kamakhya devi amy
First published on: 18-11-2022 at 18:18 IST