जळगाव : हनी ट्रॅप प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारण्यांच्या समावेशाचा संशय असताना, त्यावरून माझे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचे जळगावमधील आमदार माझ्या मागे लागले आहेत, असा आरोप एकनाथ खडसे यांनी येथे शनिवारी केला. सत्य मांडणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी अजिबात मागे हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
भाजपचे जळगावमधील सर्व आमदार हे मंत्री गिरीश महाजन यांच्या बचावासाठी एकवटले आणि त्यांनी आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले. दरम्यान, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्यावर टीका करताना त्यांच्याविषयी अपशब्द वापरले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या खडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर टीका करणाऱ्या सर्व भाजप आमदारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. हनी ट्रॅपसारख्या गंभीर प्रकरणावरून जनतेचे आणि माझे लक्ष हटविण्यासाठीच भाजपने आपल्या आमदारांना माझ्यावर तोंडसुख घेण्यासाठी जमा केले होते. पण मी दबावाखाली येणारा आणि कोणाला घाबरणारा नाही, असे खडसे म्हणाले.
भाजपचे जळगावमधील मंत्री आणि आमदार माझ्यावर टीका करण्यासाठी किती तळमळीने एकत्र आले. अशी तळमळ त्यांनी शेतकरी कर्जमाफी तसेच केळी, कापूस, सिंचनाच्या प्रश्नांवर इतके दिवस का दाखवली नाही ?, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. मी मंत्रिपदी असताना एकाच वेळी १८ खाती सांभाळली. गिरीश महाजन हे अर्ध्या खात्याचेच मंत्री आहेत. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी मला विकासाच्या गोष्टी सांगू नये. माझ्या कार्यकाळातच शासनाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील बहुतेक सर्व सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले. जळगाव शहरालाही वाघूर धरणामुळे आज पिण्याचे मुबलक पाणी मिळत आहे. शासकीय कृषी आणि अभियांत्रिकी महाविद्यालय, मुलींचे आयटीआय मी त्यावेळी मंजूर करून घेतली होती, असा दावा खडसे यांनी केला.
भाजपमध्ये असताना मी पक्षावर किंवा नेतृत्वावर कधीच टीका केली नाही. गिरीश महाजन यांना मात्र सोडले नाही. दुःख या गोष्टीचे वाटते की ज्यांना भाजपमध्ये असताना मोठे केले, तेच आमदार आता माझ्या विरोधात बोलताना दिसत आहेत. मंत्री संजय सावकारे यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मी आणले होते. मात्र, सावकारे आता मला अक्कल शिकवायला लागले आहेत. आमदार सुरेश भोळे यांना वादग्रस्त प्रकरणात सहभागी असल्याचे आरोप असतानाही जळगावमधून पुढे आणले. अमोल जावळे यांच्या वडिलांसाठी काय नाही केले, असे सांगताना खडसे थोडे भावूक झाले होते.