लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत कर्ज घेतलेल्या सभासदांकडून रक्कम घेऊन त्याची कोणतीही नोंद न करता त्यांना कर्जाची परतफेड केल्याचा (निरंक) दाखला देऊन दोन कोटी ३९ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात शासकीय प्रमाणित लेखा परीक्षक विष्णू वारुंगसे यांनी तक्रार दिली. एप्रिल २००७ ते मार्च २०२३ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. माळेदुमाला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित यांच्याकडून संस्थेतील सभासदांनी दोन कोटी ३९ लाख ७६ हजार ५५९ रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज सभासदांनी संस्थेत जमा केले. त्यापोटी त्यांना निरंक म्हणजेच कोणतेही कर्ज बाकी नाही, असा दाखला देण्यात आला. संस्थेची थकबाकी वसुली प्रणाली सुरु असताना कर्जदाराकडे चौकशी केली असता त्यांनी निरंक दाखला असल्याची माहिती दिली.

आणखी वाचा-मनमाड : ढासळलेल्या रेल्वे उड्डाणपूल दुरुस्तीसाठी तीन कोटींचा निधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपासणीत या रकमेची नोंद कर्ज खतावणी, रजिस्टर, वसुली वही, रोजकिर्द यात आढळली नाही. संस्थेची वसुली वही व रोख किर्द व्यवहार नोंदविण्यात आले नाही. तसेच ही दोन कोटी ३९ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरुन संस्थेच्या या रकमेचा अपहार संगनमताने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दत्तात्रय कोरडे (टेकाडीपाडा वणी), बाजीराव भदाणे (बेलबारे,कळवण), किशोर गांगुर्डे (वणी) अशा तिघांविरोधात फसवणूक, विश्वासघात, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमान्वये वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ वर्षानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.