जळगाव : शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बाह्यवळण महामार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. बहुप्रतिक्षीत अशा या मार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, वाहतूक सुरू होऊन काही दिवस उलटत नाही तितक्यात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढू लागल्याने पुन्हा नवीन समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.

पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गाचे काम अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पूर्णत्वास आले असून, आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, यापूर्वी पाळधीहून तरसोदकडे जाण्यासाठी वाहनांना जळगाव शहरातील जुन्या महामार्गाचा वापर करावा लागत असे. आणि यासाठी किमान पाऊण तासांचा प्रवास करावा लागत असे. मात्र, हा प्रवास नव्या बाह्यवळण महामार्गामुळे अवघ्या २० मिनिटांत पूर्ण होत असून वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होत आहे. या मार्गाच्या वापरामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अपघाताचा धोका देखील लक्षणीय घटला आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

उड्डाणपुलांलगतचे सेवा रस्ते सुरू झाल्यानंतर उत्तर दिशेला नव्याने विस्तारत असलेल्या जळगाव शहरासह परिसरातील गावांना मोठी सुविधा पुढील काळात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहतुकीची सुलभता आणखी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दररोज शहरातून धावणाऱ्या हजारो वाहनांची गर्दी आता कमी झाल्याने जळगावच्या रस्त्यांना दिलासा मिळाला आहे. वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे आणि अपघातांचे प्रमाण घटल्यामुळे नागरिक निर्धास्तपणे प्रवास करू लागले आहेत. महामार्गावरील कामाचा दर्जा उत्तम असल्याने प्रवाशांना सुखद व सुरक्षित प्रवासाचा अनुभव येतो आहे. या सुविधेमुळे व्यापारी, शेतकरी, नोकरदार आणि विद्यार्थी या सर्वच घटकांना सोयीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष

दरम्यान, नव्याने सुरू झालेल्या बाह्यवळण महामार्गालगत चहा-नाश्त्याची तात्पुरती दुकाने आता थाटली जात आहेत. संबंधितांनी दुकाने सुरू करताना महामार्गापासून काही अंतर न राखता थेट साईड पट्ट्यांवरच अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. ज्यामुळे अपघातांचा धोका कित्येक पटींनी वाढला आहे. महामार्गाची किरकोळ कामे अजुनही सुरू असल्याने कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांचा सगळीकडे वावर दिसून येत असताना, अतिक्रमणे वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एकूण सर्व प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. परिस्थिती वेळीच नियंत्रणात न आणल्यास संपूर्ण बाह्यवळण महामार्ग अतिक्रमित दुकानांच्या विळख्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.