नाशिक – राज्यात वापरल्या जाणाऱ्या केवळ ४८ टक्के पाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित ५२ टक्के सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडले जात असल्याची खंत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, आगामी काळात नद्यांचे पुनरुज्जीवन (पूर्नजन्म) हा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘एअरोनॉमिक्स २०२५’ या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात कुंभमेळयाच्या ‘ब्रँड ॲम्बेसिडर’च्या मुद्यावर बरेच कवित्व रंगले. यावेळी आमदार सीमा हिरे, राहुल आहेर, देवयानी फरांदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पर्यावरण विभागाचे सचिव अविनाश ढाकणे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, उपाध्यक्ष व मोहिमेचे समन्वयक उदय घुगे आदी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहर प्रदुषणमुक्त, पर्यावरणपूरक राहण्यासाठी या मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. प्रयागराज कुंभ आणि नाशिक कुंभ यात खूप फरक आहे. नाशिकमध्ये जागा अतिशय कमी आहे. या सर्व गोष्टींचा विचार मुख्यमंत्री करीत असल्याचे पंकजा मुंडे यांनी नमूद केले.
पुणे, मुंबईच्या तुलनेत नाशिक फारसे वाढलेले नाही. पुण्यात एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी पावणेदोन तास लागतात. शहरात येणारे लोंढे थांबवण्यासाठी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढविण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. निसर्गाची योजना आपण बिघडवत आहोत. डोंगर आपल्याला तयार करता येणार नाही. आपण इमारती बनवू शकतो. शहरात अनेक बहुमजली इमारती होत आहेत. परंतु तेथील रहिवाशांना भविष्यात पाण्याचा पुरवठा कसा होईल, याचे नियोजन आज करणे गरजेचे आहे. शासनाने प्रदूषणाबाबत दीर्घकालीन नियोजन केल्याचे त्यांनी सूचित केले. धार्मिक गोष्टी करताना प्रदूषण वाढणार नाही, याची काळजी सर्वधर्मियांनी घेतली पाहिजे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आपण स्वत: लक्ष देणार असून त्यासाठी नाशिकला वेळोवेळी येईन, असेही मुंडे यांनी सांगितले.
दरम्यान, कार्यक्रमात क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी मुंडे यांना आगामी कुंभमेळ्याच्या ‘ब्रँड ॲम्बेसिडर’ व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर मुंडे यांनी आपल्या भाषणात राजकीय वस्त्र घालून ’ब्रँड ॲम्बेसिडर‘ व्हायचे का, असा प्रश्न करताच सभागृहात एकच हशा पिकला. नंतर प्रसारमाध्यमांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर मुंडे यांनी गळ्यातील माळ दाखवत मी आहेच असे नमूद केले. धनंजय मुंडे यांना खाते दिले नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी मी तिकडे बघत नाही, तर माझ्या खात्याकडे बघते असे सांगून अधिक भाष्य करणे टाळले.