नाशिक : कोणी कसेही असू द्या, त्याचे तोंड बंद करण्यासाठी भाजपमध्ये घ्या, असा संदेश जळगाव येथील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देणारे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे रविवारी नाशिक येथे असताना सत्ताधारी भाजपला हादरा देणारी घटना घडली.

काही दिवसांपासून भाजपमध्ये समाजात ज्यांची प्रतिमा चांगली नाही, अशा व्यक्तींनाही वाजतगाजत प्रवेश देण्यात येत असल्याने पक्षातीलच निष्ठावंत आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता असताना आता खुद्द भाजपलाही अशा प्रतिमा डागाळलेल्यांचे ओझे पेलवेनासे झाले आहे. मागील आठवड्यात एका हत्या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उध्दव निमसे पोलिसांना शरण आले असताना रविवारी पुन्हा एक भाजपचा माजी नगरसेवक पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे भाजपमधील अस्वस्थता वाढली आहे.

शिवसेनेतून (उध्दव ठाकरे) हकालपट्टीनंतर सुधाकर बडगुजर यांना पक्षातील स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही पक्षाची नाशिकची जबाबदारी असणारे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोध डावलून बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. तेव्हांपासून भाजपच्या बदललेल्या भूमिकेविषयी जुन्या निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर पसरला. या नाराजीत भर पडणाऱ्या अजून दोन घटना सप्टेंबरमध्ये भाजप पक्षात घडल्या. पंचवटीतील राहुल धोत्रे या युवकाचा हाणामारीत मृत्यू झाल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक उध्दव निमसे यांच्या काही समर्थकांना अटक करण्यात आली होती. परंतु, निमसे हे फरार झाले होते. अखेर, मागील आठवड्यात ते पोलिसांना शरण आले.

या घटनेची चर्चा ताजी असताना रविवारी भाजपचा अजून एक माजी नगरसेवक जगदीश पाटील यास पोलिसांनी अटक केली. पंचवटीत काही दिवसांपूर्वी पंचवटीतील फुलेनगरात सागर जाधव याच्यावर गळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात जाधव जखमी झाला. गोळीबार प्रकरणी पंचवटी पोलीस, गुंडाविरोधी पथक आणि भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोहीम राबवून ११ जणांना अटक केली. विकी आणि विकास वाघ तसेच अमोल पारे उर्फ बबल्या आणि अजून काही जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात पंचवटी पोलिसांनी भाजपचा माजी नगरसेवक जगदीश पाटील यास अटक केली. मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये असतानाच जगदीश पाटील यास अटक झाली आहे. सराईत गुन्हेगारांशी संबंध आणि गोळीबाराचा कट रचण्यात पाटीलचा सहभाग असल्याचे म्हटले जात आहे.

जगदीश पाटील याच्या अटकेमुळे नाशिक शहरात गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजकीय पाठबळाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. सिह्स्थ कुंभमेळा जवळ येत असताना नाशिकमधील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती योग्य असावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.