नाशिक : दहावी, बारावी आणि इतकेच नव्हे तर, पदवीचे शिक्षण घेताना देखील तुम्ही अव्वल ठरता. सहजपणे यश मिळवता. नंतर असा एक टप्पा येतो की, तिथे तुमच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीला ब्रेक लागतो. भाळी अनुत्तीर्णतेचा शिक्का बसतो. तुम्ही मानसिकदृष्ट्या ढासळता. ही अतिशय कठीण परिस्थिती असते. यातून कसेतरी बाहेर पडून तुम्ही तयारीला लागता. आणि पुन्हा अपयशच पदरी पडते. अशावेळी कोणाच्याही मनात हे शिक्षणच सोडून देण्याचा विचार येईल. शिवानी तिळवणकरचे तसेच झाले होते. अनेकदा अपयश आणि कौटुंबिक संकट कोसळल्यावर तिचा हाच विचार होता. मात्र आई आणि बहिणीच्या पाठबळाने ती नव्या दमाने अभ्यासाला लागली. आणि अथक प्रयत्नांती शालेय जीवनात पाहिलेले सनदी लेखापाल अर्थात सीए बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकली…
इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतलेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. अंतिम परीक्षेत नाशिकच्या शिवानी तिळवणकरने यश मिळवले. जवळपास सात वर्ष ती सीए परीक्षेचे अवघड असे तीन टप्पे पार करण्यासाठी संघर्ष करीत होती. गतवेळी अवघ्या तीन गुणांनी तिला यशाने हुलकावणी दिली. अनेक चढ-उतार, कौटुंबिक आघात, अडथळे जिद्दीने पार करीत शिवानीने अखेर यशाला गवसणी घातली. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी वाणिज्य शाखेची नाही. दिवंगत वडील पराग तिळवणकर हे अभियंता होते. तर आई सुमेधा कला शाखेची पदवीधर. कुणाचा दूरपर्यंत किचकट आकडेमोडीशी संबंध नव्हता. शिवानी मात्र त्या उलट. गणित इतका आवडीचा विषय की, निर्मला कॉन्व्हेंट शाळेत आठवीतच तिने सीए बनायचे पक्के केले. दहावीला गणितात १०० पैकी ९६ गुण मिळाल्यावर तिला रडू कोसळले होते. का तर चार गुण कुठे गेले म्हणून.
बीवायके महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेताना जून २०१८ मध्ये शिवानीने सीएची तयारी सुरू केली. ही परीक्षा अतिशय कठीण असते. निकाल अतिशय कमी लागतो. सीए फर्ममध्ये तीन वर्ष ‘आर्टिकलशीप’ करावी लागते. एसएसके आणि कंपनीत तिने ती केली. वाणिज्य पदव्युत्तर परीक्षेवेळी अकस्मात वडिलांचे निधन झाले. या कठीण प्रसंगात देखील ती परीक्षा देत होती. सीए शिक्षणात सलग १० ते १५ तास अभ्यास हा दिनक्रम बनला. इतका अभ्यास करूनही काही विषय सुटत नव्हते. धीर खचत होता. हा अभ्यास सोडून एमबीए करावे आणि घरची जबाबदारी सांभाळण्याचा विचारही ती करू लागली. कारण, सातवेळा दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा द्यावी लागली.
आई व लहान बहीण प्रथा यांनी बळ दिल्याने हा टप्पा पार करता आल्याचे शिवानी सांगते. अंतिम परीक्षेत संयमाने परीक्षा पाहिली. तसेच कष्ट उपसावे लागले. या काळात परीक्षा पद्धती बदलली. मागील परीक्षेत सर्व विषय उत्तीर्ण झाली, पण ऑडिट विषय तीन गुणांनी राहिला. इतर विषयात चांगले गुण असल्याने पुन्हा सर्व विषय देण्याची वेळ आली नाही. पुन्हा सलग १० ते १५ तास ऑडिटसारख्या एकाच सैद्धांतिक विषयाचा अभ्यास करणे जिकिरीचे ठरते. भविष्यात पुन्हा ही परीक्षाच द्यावी लागणार नाही, या निर्धाराने तयारी करीत तिने हा विषयही सोडवला. सीए परीक्षेचे अग्निदिव्य पार करणारे सीए सुद्धा पुन्हा ही परीक्षा देण्यास धजावत नाही, इतकी ती अवघड असल्याचे सांगितले जाते. शिवानी तिळवणकरने वारंवार अपयशाचा सामना करावा लागला तरी, इप्सित ध्येय गाठता येते हेच सिद्ध केले आहे.
