लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरांसह परिचारिकांच्या हलगर्जीमुळे नवजात शिशूंची अदलाबदल झाल्याचा प्रकार घडला. संबंधित पालकांना नवजात शिशूंसंदर्भात निरोप देण्यात झालेल्या चुकीमुळे रुग्णालयात गोंधळ उडाला. प्रशासनाने दोन्ही नवजात शिशूंना नवजात बालक अतिदक्षता विभागात दाखल केले असून डीएनए चाचणीद्वारे आता खरे पालक निश्‍चित केले जाणार आहेत.

पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील प्रवीण भिल यांच्या पत्नी प्रतिभा आणि भुसावळ तालुक्यातील टहाकळी येथील उमेश सोनवणे यांच्या पत्नी सुवर्णा यांना प्रसूतीसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यामुळे त्यांची तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. दोघींची शस्त्रक्रिया करण्यात आली. एकीला मुलगा आणि दुसरीला मुलगी झाली. मात्र, नवजात शिशू पालकांकडे सोपविताना निरोप देण्यात झालेल्या गोंधळामुळे त्यांची अदलाबदल झाली. प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि परिचारिकांकडून झालेली ही चूक नंतर उघड होताच प्रसूती कक्षात गोंधळ उडाला. दोन्ही नवजात शिशूंचे पालक आणि नातेवाइकांनी डॉक्टर व परिचारिकांना धारेवर धरले.

आणखी वाचा- धुळे: वाहतूक पोलीस लाच घेतांना जाळ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालय प्रशासनाने दोन्ही नवजात शिशूंना ताब्यात घेत त्यांना नवजात बालक अतिदक्षता विभागात दाखल केले. खरे पालक शोधण्यासाठी आता दोन्ही शिशू आणि मातांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली. उमेश सोनवणे यांच्या पत्नीलाही मुलगा झाल्याची माहिती प्रसूतिगृहातील शिकाऊ परिचारिकांनी दिल्यामुळे हा गोंधळ झाला असल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली आहे. डीएनए चाचणी रक्ताच्या नमुन्यांच्या आधारे केली जाते. ते नाशिकच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले असून, त्यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी सांगितले आहे.