अविनाश पाटील

शेतीच्या कामासाठीही मदत

नाशिक : जिल्ह्य़ासह उत्तर महाराष्टातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्य़ात करोना रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होऊ लागली असली तरी ग्रामीण भागात मात्र अजूनही प्रमाण शहरी भागापेक्षा कमीच आहे. करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाला अधिक हादरविले. पहिल्या लाटेत करोनापासून दूर राहिलेल्या अनेक गावांमध्ये दुसऱ्या लाटेत करोना इतका वेगाने शिरला की शेतकरी, ग्रामस्थांना सांभाळणे कठीण गेले. रुग्णालयांमध्ये दाखल झाल्यावर येणारा खर्चच रुग्णासह त्याच्या नातेवाईकांना अर्धमेला करु लागल्याने करोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी वस्त्यांवरच राहणे श्रेयस्कर समजले आहे. त्यामुळेच एप्रिल आणि मे या दोन महिन्यात शेतांवर राहणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी मुखपट्टी आणि सॅनिटायझरच्या वापरासह सामाजिक अंतर राखणे हे एक पथ्य महत्वाचे आहे. एप्रिल महिन्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला. ग्रामीण भागात त्याचे लोण अधिक पोहचले. अर्थात लग्न आणि अंत्यविधी यात होणारी गर्दी त्यास अधिक कारणीभूत ठरल्याचे बहुतेकांचे निरीक्षण आहे. प्रारंभी नियमांविषयी बहुतांश प्रमाणात असलेला बेफिकीरपणा ग्रामीण भागास भोवला. सटाणा तालुक्यातील बहिराणे, चिराई, टेंभे आदी लहानशा खेडय़ांमध्येही करोनाने हातपाय पसरविल्यावर आणि त्याची झळ आपल्या घरासही बसू लागल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र ग्रामस्थ सावध झाले.

करोनाची पहिल्या लाटेमुळे टाळेबंदीला द्यावे लागलेले तोंड, त्यानंतर अधूनमधून अवकाळी पावसाने दिलेला झटका यामुळे आधीच आर्थिकदृष्टय़ा मेटाकु टीला आलेले शेतकरी घरातील एखादा सदस्य करोनाबाधित झाल्यावर रुग्णालयात त्याच्यावरील उपचारावर होणाऱ्या खर्चाचा आकडा पाहूनच रुग्णालयाचा धसका घेऊ लागले. गावांमध्येही करोनामुळे मृत्यूही होऊ लागल्यावर या आजारास दूर ठेवण्यासाठी अनेक गावांमध्ये ज्यांना शक्य होते, अशा शेतकऱ्यांनी गावातील घर सोडून शेताचा आसरा घेतला. ज्यांचे शेतात घर नव्हते; त्यांनी तात्पुरत्या स्वरुपातील झोपडीवजा घर उभारले.

किराणा किं वा इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शेतातून एखादीच व्यक्ती के वळ गावात येऊ लागली. बहुतेक जण शेतांमध्ये राहू लागल्याने अनेक खेडय़ांमधील परिस्थितीही बदलली. खेडी जणूकाही ओसाड झाल्यासारखी भासू लागली. घरे कु लूपबंद दिसू लागली. मालेगाव, सटाणा, देवळा, नांदगाव या तालुक्यांसह धुळे जिल्ह्य़ातील भडगाव, कळंभीर यासह साक्री तालुक्यातील नवापाडा, वडपाडा, पिंजारझाडी, पांगणदर या आदिवासीबहुल पाडय़ांमध्ये शेतांत राहणाऱ्यांची संख्या अचानक वाढल्याचे दिसून आले. पावसाळ्याच्या पाश्र्वभूमिवर त्यातील काही पुन्हा गावात परतले आहेत. अर्थात इतरत्र अशी स्थिती नाही. खरीपाच्या कामांसाठी शेतांची मशागत करण्यावरही यानिमित्ताने शेतकरी थेट शेतातच राहू लागल्याने अधिक लक्ष देता येऊ लागले. करोनाचे संकट पूर्णपणे दूर होईपर्यंत तरी शेतात गेलेली मंडळी खेडय़ांमध्ये, गावांमध्ये परत येण्याची शक्यता कमीच आहे.

आमच्या खेडय़ातील बहुतेक जण आधीच शेतांवर राहत असतांना करोनाची दुसरी लाट आल्यावर अजून काही शेतकरी शेतात राहण्यास गेले. जवळच्या बोढरी, टेंभे यासह इतर खेडय़ांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे दिसते.

-विजय धोंडगे (बहिराणे, सटाणा) 

काही दिवसांपूर्वी गावातील घर सोडून शेतात राहण्यास गेलो. करोनाचा संसर्ग होऊ नये यासह शेतीच्या कामावर अधिक लक्ष देता येणे हाही हेतू त्यामागे आहे.

-रवींद्र बेडसे (भडगाव, साक्री)